मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, अभ्यासाच्या टेन्शनमुळे कृत्य, नायर हॉस्पिटलमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 10:47 PM2017-09-12T22:47:41+5:302017-09-12T22:47:41+5:30
येथील नायर वैद्यकीय दंत महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या करण्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मुंबई, दि. 12 - येथील नायर वैद्यकीय दंत महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा (वय २०) असे तिचे नाव असून आत्महत्येपूर्वी तिने मित्राला व्हॉटस्अपवर मॅसेज करुन आपल्या कृत्याबाबत कल्पना दिली होती. या प्रकाराने महाविद्यालयातील विद्यार्थी वर्तुळामध्ये शोककळा पसरली.
भाग्यलक्ष्मी मुठा ही मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील इंचलकरंजी येथील असून महापालिकेच्या नायर वैद्यकीय दंत महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती. मात्र अभ्यासक्रम अवघड जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून ती अस्वस्थ होती. मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या रुममध्ये कोणी नसताना तिने फॅनला ओढणी अडकवून गळफास लावून घेतला. दुपारी एकच्या सुमारास तिची रुम पार्टनर त्याठिकाणी आली असता हा प्रकार उघडकीस आला. तिने आरडाओरड करीत इतरांना कळविले. भाग्यलक्ष्मीला केईएम हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळी ‘सुसाईड नोट’ आढळली नाही. मात्र आत्महत्येच्या थोड्या वेळापूर्वी तिने ‘रेडिओलॉजिस्ट’विभागात शिकत असलेल्या आपल्या मित्राला व्हॉटस्अॅपवर त्याबाबत मॅसेज केल्याचे आढळून आल्याचे काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप उगले यांनी सांगितले. याबाबत हॉस्टेलमधील तिचे अन्य सहकारी, मित्रमंडळीकडे चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाग्यलक्ष्मीने मित्राला केलेल्या व्हॉटस्अपमध्ये बीडीडीएसचे शिक्षण आपल्याला अवघड जात आहे, मात्र घरच्यांनी शिक्षणासाठी खुप खर्च केला असल्याने ते सोडू शकत नाही. त्यामुळे निराश असून जीवनाचा अंत करावासा वाटतो, मला सगळ्यांनी माफ करावे, अशा आशयाचा मॅसेज पाठविला होता. मित्राने तिला समजाविणारा मॅसेज पाठविला. मात्र, भाग्यलक्ष्मीने त्याकडे दुर्लक्ष करीत आयुष्यचा शेवट करुन घेतला.