Join us  

मासिकपाळीच्या त्रासातून आत्महत्या

By admin | Published: January 28, 2016 2:33 AM

तिला घरच्यांचा त्रास नव्हता... तिला शिक्षणाचा कोणताही ताण नव्हता आणि तिचा प्रेमभंगही झाला नव्हता... असे असतानाही त्या तरुणीने आपले आयुष्य संपविले.

अंबरनाथ : तिला घरच्यांचा त्रास नव्हता... तिला शिक्षणाचा कोणताही ताण नव्हता आणि तिचा प्रेमभंगही झाला नव्हता... असे असतानाही त्या तरुणीने आपले आयुष्य संपविले. केवळ मासिकपाळीचा त्रास सहन न करू शकल्याने तिने आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांनीच लोकमतकडे ही स्पष्ट कबुली दिली. यावरून मासिकपाळीबाबत जनजागृतीची किती आवश्यकता आहे आणि वैद्यकीय उपचारांची सोय कशी कमी पडत आहे, हे दाहक वास्तव समोर आले. अंबरनाथमधील गायकवाडपाडा परिसरात राहणारी केतकी (२०) (नाव बदलले आहे) ही तरुणी आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. घरची परिस्थिती तशी बेताचीच. मात्र, आई मोलमजुरी करुन आणि वडील एका चहाच्या दुकानात काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. केतकीला गेल्या पाच वर्षांपासून मासिकपाळीचा प्रचंड त्रास होत होता. त्या दिवसांमध्ये पोट दुखण्याचा त्रास असह्य होत होता. हा त्रास झाल्यावर ती परिसरातील डॉक्टरांकडे जाऊन तात्पुरते औषध घेत असे. मात्र, तिच्या त्रासात थोडीही कमतरता येत नव्हती. दर महिन्याच्या या त्रासामुळे ती घराबाहेर पडणे टाळत होती. क्वचितच, ती घराबाहेर पडत होती. तिच्या या त्रासाची माहिती शेजारच्यांनाही होती. घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने मोठ्या डॉक्टरांना दाखविणे शक्य झाले नाही. केतकीने त्रास अंगावरच काढला. मात्र, हा त्रास असह्य झाल्याने अखेर या त्रासाला कंटाळून रविवारी सकाळी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. - केतकीच्या आत्महत्येमुळे मुलींच्या शरीररचनेतील नैसर्गिक बदलांबाबत जनजागृती आणि मार्गदर्शन किती गरजेचे आहे, ही बाब अधोरेखित होते. केतकीला इतर कोणताही त्रास नसतानाही तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. केतकीची आई तर भेदरलेल्या अवस्थेत आहे.‘‘ गेल्या पाच वर्षांपासून तिला हा त्रास होता. औषधांमुळे कोणताही फरक पडला नाही. मात्र, ती असे काही करेल, असे आम्हाला कधीही वाटले नाही. या त्रासामुळे ती नेहमी घरी राहणेच पसंत करत होती. - पीडित मुलीची आई‘‘१०० मुलींपैकी एखाद्या मुलीला मासिकपाळीच्या वेळी असह्य त्रास होतो. मात्र, योग्य औषधोपचार केल्यास तो त्रास कमी करता येतो. केतकीवर योग्य उपचार झाले असते तर तिच्यावर ही वेळ आली नसती. मुलींना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.-डॉ. संगीता कंदोई, स्त्रीरोगतज्ज्ञ