Join us

पैसे, फसवणूक आणि मंत्रालयात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 4:51 AM

बँकेत नोकरी लावतो अशी बतावणी करत हर्षलने मेहूणी सुवर्णा कदम कडून ८५ हजार रूपये उकळले होते. त्यानंतर बनावट नियुक्तीपत्र तयार करून ते कुरियरमार्फत तिला पाठविले.

मुंबई : बँकेत नोकरी लावतो अशी बतावणी करत हर्षलने मेहूणी सुवर्णा कदम कडून ८५ हजार रूपये उकळले होते. त्यानंतर बनावट नियुक्तीपत्र तयार करून ते कुरियरमार्फत तिला पाठविले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुवर्णा आपली बदनामी करेल, या भीतीने त्याने २००३ साली सुवर्णावर चाकूने ४४ वार करीत तिची हत्या केली. या प्रकरणी ठाणे जिल्हा न्यायालयाने हर्षलला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर हर्षलची पैठण कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याने आतापर्यंत १२ वर्ष ६ महिने शिक्षा भोगली आहे.या कालावधीत त्याने ६ वेळा संचित आणि २ वेळा अभिवचन रजा उपभोगल्या आहेत. शासन निर्णयाप्रमाणे खूनाच्या गुन्ह्यात कूरता अधिक असेल किंवा गुन्हा महिला वा बालकांविरूद्ध असेल तर जन्मठेपेच्या शिक्षेत २६ वर्षांनंतर माफी देता येते. त्यामुळ हर्षलला आणखी ५ वर्ष माफी देता येणे शक्य नव्हते, असे गृहविभागातील सुत्रांनी दिली आहे. मात्र शिक्षेत सुट मिळावी म्हणून त्याने धडपड चालविली होती. अखेर पैशाच्या लोभापायी फसवणूकीने सुरु झालेला हर्षलचा हा दुर्दैवी प्रवासाचा शेवट मंत्रालयातील आत्महत्येने झाला.हर्षल रावते याची सुसाईड नोट मिळाल्याची माहिती पोलीस प्रवक्ते दिपक देवराज यांनी दिली आहे.