मुंबई - कुर्ला सुटकेस मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यास गुन्हने शाखेला यश आले. चारित्र्याच्या संशयावरून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकरानेच हत्या करून मृतदेह सुटकेसमधून फेकल्याचे समोर आले. याप्रकरणी धारावीत राहणाऱ्या २२ वर्षीय प्रियकर अस्कर मनोज बरला (२२) याला अटक केली.
कुर्ला येथे मेट्रो रेल्वेच्या बांधकाम स्थळाजवळ एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही याप्रकरणी समांतर तपास सुरु केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हे शाखेच्या कक्ष ५ व कक्ष ११ यांचे आठ तपास पथके तयार केली. तरूणीचा फोटो आणि अंगावरील कपड्यांच्या सहाय्याने पोलिसांनी तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला. तरुणी धारावीतील रहिवासी असल्याचे समजताच तपासाला वेग आला. प्रियकर अस्कर मनोज बरला (२२) हा गावी ओडिसाला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकातून सापाला रचून त्याला अटक केली.
प्रतिमा पवल किसपट्टा (२५) असे मृत मुलीचे नाव असून ती मूळची ओडिसा येथील रहिवासी आहे. ती आरोपी बरला सोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये धारावी परिसरात राहायची. मात्र चारित्र्याच्या संशयातून दोघांमध्ये खटके उडायचे. याच वादातून आरोपीने तिची गळा दाबून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने प्रतिमाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून कुर्ल्यातील मेट्रो रेल्वेच्या बांधकाम स्थळाजवळ आणून फेकला. तेथे रेल्वेच्या बांधकामादरम्यान कुणाचे याकडे लक्ष जाणार नाही म्हणून हे ठिकाण निवडले. तेथून गावी जाण्याच्या प्रयत्न असतानाच गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या.