मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या विधानावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं होते. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी रस्त्यावर उतरण्याचं खुलं आव्हानचं दिलं होतं. त्यासंदर्भात पुन्हा एकदा माध्यमांशी बोलताना सुजात आंबेडकर यांनी दंगली पेटवण्यासंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरुन, त्यांच्यावर पलटवारही करण्यात येत आहे.
''आत्तापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, मग ती बाबरी मस्जिदची दंगल असो किंवा भीमा-कोरेगावची दंगल असो. आपण हेच बघितलयं की, दंगली पेटवणारे हे उच्चवर्णीय आणि उच्चवर्णीय ब्राह्मण असतात. पण, त्यांच्या विधानावर प्रभावी होऊन, या दंगलीत सहभागी होतात ते जास्त करुन बहुजन पोरं असतात'', असं विधान सुजात आंबेडकर यांनी मीडियाशी बोलताना केलं होतं.
राज यांच्या भाषणानंतर अमित ठाकरेंना दिलं आव्हान
मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीत, तर आम्ही मशिदीसमोर दुप्पट लाऊड स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू, असा इशारा काल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला होता. ते मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते. राज ठाकरेंच्या याच विधानाचा आधार घेत प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी थेट अमित ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे.