अंतराळाचे दर्शन घडवणारे सुजाता बजाज यांचे 'स्पेसस्केप्स'; द आर्ट फेअरमध्ये मनमोहक चित्रांचे प्रदर्शन

By संजय घावरे | Published: November 17, 2023 08:29 PM2023-11-17T20:29:46+5:302023-11-17T20:29:59+5:30

महालक्ष्मी येथील रेस कोर्सवर 'द आर्ट फेअर' हे चित्रांचे भव्य प्रदर्शन सुरू आहे. यात सुजाता बजाज यांची 'स्पेसस्केप्स' हि चित्रे कलाप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

Sujata Bajaj's 'Spacescapes', which depicts space; An exhibition of captivating paintings at The Art Fair | अंतराळाचे दर्शन घडवणारे सुजाता बजाज यांचे 'स्पेसस्केप्स'; द आर्ट फेअरमध्ये मनमोहक चित्रांचे प्रदर्शन

अंतराळाचे दर्शन घडवणारे सुजाता बजाज यांचे 'स्पेसस्केप्स'; द आर्ट फेअरमध्ये मनमोहक चित्रांचे प्रदर्शन

मुंबई - विविध संकल्पनेवर आधारलेल्या लक्षवेधी चित्रांद्वारे कलाप्रेमींना मोहिनी घालणाऱ्या चित्रकार सुजाता बजाज यांच्या 'स्पेसस्केप्स' हे चित्रांचे प्रदर्शन द आर्ट फेअरमध्ये भरवण्यात आले आहे. अंतराळातील रहस्यमय अँबस्ट्रॅक्शन्स आणि वास्तविकतेचा संगम सुजाता यांच्या चित्रांमध्ये पाहायला मिळत आहे.

महालक्ष्मी येथील रेस कोर्सवर 'द आर्ट फेअर' हे चित्रांचे भव्य प्रदर्शन सुरू आहे. यात सुजाता बजाज यांची 'स्पेसस्केप्स' हि चित्रे कलाप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. किरण नाडर, संगीत जिंदल आदी कला तसेच विविध क्षेत्रांमधील मान्यवर या प्रदर्शनाला भेट देत आहेत. आजवर भारतासह न्यूयॉर्क, लंडन, पॅरीस अशा विविध देशांमध्ये सुजाता यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली आहेत. त्यांची 'स्पेसस्केप्स' ही चित्रांची सिरीज एका अनोख्या संकल्पनेवर आधारलेली आहे. विविध रंगांच्या जवळपास २५ लेअर्सच्या आधारे हि चित्रे रेखाटण्यात आली आहेत. वरवर पाहिल्यास या लेअर्स दिसत नाहीत. यासाठी सिल्व्हर फॉईल आणि अॅक्रेलिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. अंतराळात खोलवर अ‍ॅबस्ट्रॅक्शन आणि वास्तविकता एकरूप असल्याचे सांगत सुजाता म्हणाल्या की, मागील पाच वर्षांपासून मी स्पेसस्केप्स सिरीजवर काम करत आहे. कोरोनाच्याही अगोदरपासून यावर विचार करायला सुरुवात केली होती. सोलर सिस्टीम, गॅलॅक्सी आणि डोळ्य्यांना जे दिसते त्याच्याही पलिकडे जे आहे ते खूप अथांग आणि रहस्यमय आहे. त्याबद्दल आपल्याला फार माहित नाही. त्याचा उलगडा या चित्रांद्वारे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेबवर जेव्हा अवकाशातील फोटो येऊ लागले, तेव्हा अवकाशातील रहस्यमय अॅबस्ट्रॅक्शनचे आकर्षण आणखी वाढले. अँबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट म्हणून मी विचार करू लागले आणि या सिरीजची संकल्पना मूर्त रूप धारण करू लागली. या सर्वांचे मूळ माझ्या बालपणात दडलेले आहे. लहानपणी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत विनोबा भावेंच्या आश्रमात १५ दिवसांसाठी जायचो. तिथे त्यांचे बंधू शिवाजी भावे आम्हा मुलांना खगोलशास्त्राबाबत सांगायचे. त्यांच्याकडे टेलिस्कोप होता. पहाटे तीन वाजता उठवून ते ताऱ्यांचे दर्शन घडवायचे. तेव्हापासून मला अवकाशातील रहस्यमय गोष्टींबाबत आकर्षण निर्माण झाले होते. त्याचे कुठेतरी आजही कनेक्शन आहे. 

या प्रदर्शनात सहा मोठी आणि सहा छोटी अशी एकूण १२ चित्रे मांडण्यात आली आहेत. यात ५ बाय ५ फुटांचे चित्र सर्वात मोठे आहे. याखेरीज ५ बाय १० फुटांचे चित्रही आहे. २००८मध्ये सुजाता यांचे शेवटचे अॅबस्ट्रॅक्ट चित्रांचे प्रदर्शन मुंबईत भरले होते. ४ मार्च २०२५ रोजी जहांगीर आर्ट गॅलरीतील तीन गॅलरीमध्ये या सिरीजचे भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सध्या चित्रे काढण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Sujata Bajaj's 'Spacescapes', which depicts space; An exhibition of captivating paintings at The Art Fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.