मुंबई - भाजपाकडून अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून पुन्हा एकदा सुजय विखेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, महायुतीचे उमेदवार म्हणून सुजय विखेंनी प्रचाराला सुरुवात केली. दुसरीकडे राष्ट्रवादीतील आपल्या आमदारकीचा राजीनामा देत पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी तुतारी हाती घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर, दुसऱ्याचा दिवशी अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून निलेश लंकेंची उमेदवारीही जाहीर झाली. त्यामुळे, नगरमध्ये विखेपाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगला आहे. सुजय विखेंनी आज पहिल्यांदाच निलेश लंकेंवर जोरदार हल्लाबोल केला.
लोकसभेच्या निवडणुकीतून निवडून आलेला खासदार दिल्लीत जातो. त्यामुळे, या खासदार महोदयांना हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आता, खासदार सुजय विखेंनी हाच मुद्दा धरुन निलेश लंकेंवर बोचरी टीका केली. त्या टीकेला आता निलेश लंकेंकडूनही जशात तसं उत्तर देण्यात आलं आहे.
लंके यांनी पाथर्डीतील मोहटा देवीच्या दर्शनाने आपल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी, त्यांनी नाव न घेता सुजय विखेंवर टीका केली. मतदारसघातील दहशत संपवण्यासाठी मी निवडणुकीला उभा राहिलो आहे, तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मला खासदार बनायचं आहे, असे म्हणत त्यांनी विखे पाटलांच्या घराणेशाहीवर आणि दबावावर हल्लाबोल केला. त्यानंतर, विखे पाटील यांनीही प्रचाराच्या जाहीर सभेत निलेश लंकेंची खिल्ली उडवली. निलेश लंकेंनी माझ्याएवढे इंग्रजी बोलून दाखवावे, भलेही एक महिनाभर भोकमपट्टी करावी, पाठ करुन बोलून दाखवावे, पण इंग्रजीत बोलावे. त्यांनी इंग्रजीत बोलून दाखवल्यास मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो, असे चॅलेंजच सुजय विखेंनी लंकेंना दिले होते. आता, लंकेनीही सुजय विखेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांना पैशाची मस्ती असल्याचे म्हटले आहे.
समोरच्या उमेदवाराकडे, असलेल्या पैशाची मस्ती आहे. एका बाजूला सांगायचं की जे सक्षम आहे, त्यांनीच राजकारण करायचं, दुसरीकडे सांगायचं निलेश लंकेला इंग्रजी बोलता येत नाही. पण, मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे मी इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही, असे म्हणत सुजय विखेंच्या टीकेला लंकेनी पलटवार केला. तसेच, अहमदनगरमधील निवडणूक ही गरीब विरुद्ध श्रीमंत आहे. आपण वैयक्तिक टीका-टीपण्णी करण्यापेक्षा गेल्या ५ वर्षात काय काम केलं ते सांगा, असा सवालही लंकेनी विखे पाटलांना विचारला आहे.