लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेतील कोविड कंत्राट घोटाळ्याप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक सुजित पाटकर यांचा ताबा घेत अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कोरोना काळात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने कोविड काळात केलेल्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, फर्मचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन हा गुन्हा पूढील तपासासाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी पाटकर प्रयत्न करत होते. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटक पूर्व जमीन फेटाळताच आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा ताबा घेत अटक केली आहे.
ईडीनेही याप्रकरणाची माहिती घेत तपास सुरु करत पाटकर यांना २० जुलैला अटक केली. एनएससीआय वरळी व दहिसर येथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सर्व्हिस कंपनीला मिळाले होते. त्याबाबत कंपनीकडून महापालिकेला सादर केलेला हजेरीपट व कागदपत्रे बनावट असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. करोना केंद्रांवर कार्यरत वैद्यकीय कर्मचारी ५० ते ६० टक्के कार्यरत असतानाही बनावट कागदपत्रे तयार करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आकडा फुगवण्यात आला. हा सर्व प्रकार सुजीत पाटकर यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप आहे.