Join us

सुजित पाटकर यांना जामीन मंजूर, पण... तूर्तास मुक्काम तुरुंगातच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 7:52 AM

पाटकरांना जामीन मंजूर झाला असला तरी ते कारागृहाबाहेर येऊ शकत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ठाकरे गटाचे राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना जम्बो कोरोना सेंटर घोटाळ्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. याच प्रकरणातील अन्य आरोपींची जामिनावर सुटका झाल्याने व आरोपपत्र दाखल केल्याने न्यायालयाने पाटकर यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

पाटकरांना जामीन मंजूर झाला असला तरी ते कारागृहाबाहेर येऊ शकत नाहीत. कारण, मनी लाँड्रिंग प्रकरणात ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस. पी. शिंदे यांनी शुक्रवारी पाटकर यांचा जामीन अर्ज मंजूर केला. सोमवारी आदेशाची प्रत उपलब्ध झाली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, पाटकर व अन्य आरोपींवर आरोपपत्र दाखल केल्याचे दंडाधिकारी यांनी म्हटले.

न्यायालयाने नोंदविली निरीक्षणेआरोपीवर अद्याप खटला भरविण्यात आलेला नाही. खटला सुरू होण्यास काही वेळ लागेल. आरोपीवर आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नजीकच्या काळात खटला पूर्ण होण्याची शक्यता नाही. अन्य आरोपींची जामिनावर सुटका झाल्याने पाटकरही 'समानतेच्या आधारावर जामिनास पात्र आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. सुजित पाटकर, हेमंत गुप्ता, संजय शहा आणि राजू साळुंखे यांनी कोरोना काळात जो कोरोना सेंटर्सना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कंत्राटासाठी महापालिकेकडे खोटी कागदपत्रे जमा केली व कंत्राट मिळविले, असा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.

टॅग्स :शिवसेनामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस