मुंबई : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना कोविड केंद्राच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयाने १० ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.ईडीतर्फे ॲड. कविता पाटील यांनी सुजीत पाटकर यांचा आणखी ताबा ईडीला नको असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यांनी असे सांगताच न्या. एम. जी. देशपांडे यांनी पाटकर यांना १० ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पाटकर यांचे वकील सुभाष झा यांनी पाटकर यांना न्यायालयीन कोठडीत आर्थो बेड, औषधे आणि घरचे जेवण नेऊन देण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यांना आर्थो बेड आणि औषधे नेण्यास परवानगी दिली. मात्र, घरचे जेवण देण्यास नकार दिला.अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या आधारे पाटकर व अन्य जणांवर मनी लॉड्रिंगअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर ईडीने पाटकर यांना अटक केली.
सुजीत पाटकर यांना १० ऑगस्टपर्यंत कोठडी, कोविड केंद्र आर्थिक गैरव्यवहार प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 3:35 PM