Join us

कंत्राटासाठी सुजीत पाटकरने संजय राऊतांचे नाव वापरले; ईडीच्या आरोपपत्रात गंभीर दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 8:35 AM

कंत्राट मिळविण्यासाठी पाटकर यांनी खासदार संजय राऊत यांच्या नावाचा वापर केला, असा गंभीर आरोप ईडीने आरोपपत्रात नमूद केला आहे.

मुंबई : जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या सुजीत पाटकर याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.  कंत्राट मिळविण्यासाठी पाटकर यांनी खासदार संजय राऊत यांच्या नावाचा वापर केला, असा गंभीर आरोप ईडीने आरोपपत्रात नमूद केला आहे.

वरळी येथील एनएससीआय व दहीसर येथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीला मिळाले होते.  कोविड सेंटरवर कार्यरत वैद्यकीय कर्मचारी ५० ते ६० टक्के असतानाही बनावट कागदपत्रे तयार करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आकडा वाढवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. लाइफलाइन कंपनीला कंत्राट मिळवून देण्यातही पाटकर यांची महत्त्वाची भूमिका होती, तसेच लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनी स्थापन करताना पाटकर यांनी केवळ १२ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली होती. यातून मिळालेली मोठी रक्कम पाटकर यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे ईडीच्या तपासातून उघडकीस आले.

याप्रकरणी सुजीत पाटकर यांना अटक झाली असून, ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. निविदा मिळवण्यासाठी तत्कालीन आयुक्त जैस्वाल यांच्या अनुपस्थितीत पाटकर यांनी संजय राऊत यांच्या नावाचा वापर केला होता. राजकीय वजन वापरल्यामुळे सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीला कंत्राट मिळाल्याचे ईडीने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर याप्रकरणी आणखी चौकशी करणे आवश्यक असल्याचे ईडीने नमूद केले आहे.