Join us

सुजित पाटकरांची गुन्ह्याविरोधात याचिका; उच्च न्यायालयाने नोटीस बजावली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 5:22 AM

या याचिकेवरून उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकार आणि मुंबई पोलिस यांना नोटीस बजावली.

मुंबई : कथित कोविड केंद्र घोटाळ्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्याने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरून उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकार आणि मुंबई पोलिस यांना नोटीस बजावली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या आधारे पाटकर व अन्यांवर मनी लाँडरिंगअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

पाटकर यांच्यावर पुण्याप्रमाणेच आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची बाब त्यांचे वकील सुभाष झा यांनी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे व न्या. आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी पाटकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दोन्ही याचिका एकत्रित करत ३१ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी ठेवली.

     वरळी व दहिसर येथील जम्बो कोविड सेंटर्सचे कंत्राट राजकीय व्यक्तींच्या प्रभावातून मिळविल्याची माहिती पाटकर यांनी दिल्याचा दावा करत ईडीने पाटकर यांची आणखी चौकशी करण्यासाठी सहा दिवसांच्या ताब्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली. त्यानंतर न्यायालयाने पाटकर यांना १ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

टॅग्स :संजय राऊत