कोरोनाचा परिणाम, प्रवासीसंख्येसह विमान उड्डाणांतही घट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील सर्वात व्यस्त विमानतळ अशी ओळख असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट आहे. राज्य शासनाने लागू केलेली संचारबंदी, आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधांत झालेली वाढ आणि कोरोनाची धास्ती या कारणांमुळे येथील प्रवासीसंख्येत कमालीची घट झाली आहे.
कोरोनापूर्वी मुंबई विमानतळावरून दिवसाला सरासरी ९०० विमाने ये-जा करायची. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तीन महिने या विमानतळावरील प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली. २५ मे २०२० पासून देशांतर्गत वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध अद्यापही कायम आहेत. त्याचा परिणाम विमान फेऱ्यांवर झाला आहे. मे २०२० ते मार्च २०२१ पर्यंत मुंबई विमानतळावरून प्रतिदिन सरासरी ३०० विमानांचे उड्डाण होत होते. मात्र, एप्रिलपासून या संख्येत सातत्याने घट होत गेली. त्यामुळे टर्मिनल १ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर १५ एप्रिलपासून मुंबई विमानतळावरील प्रवासीसंख्येत कमालीची घट झाली आहे. त्याचा परिणाम विमान उड्डाणांवर होत आहे. सध्या येथून दिवसाला केवळ १२५ ते १५० विमानांचे उड्डाण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ १५ हजारांच्याही खाली आली आहे. कोरोनापूर्वी मुंबई विमानतळावरून प्रतिदिन सरासरी दीड लाख प्रवासी ये-जा करायचे.
* इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी वाहन मिळेना!
दिल्लीनंतर सर्वाधिक प्रवासी हाताळणारे विमानतळ म्हणून मुंबईची ओळख आहे. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे येथील प्रवासीसंख्येत कमालीची घट झाली आहे. प्रवासी मिळत नसल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी पाठ फिरवली आहे. परिणामी रात्री ९ नंतर मुंबई विमानतळावर उतरल्यास इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी वाहन मिळत नसल्याचे चित्र सध्या आहे.
* टॅक्सींना पार्किंग परवडेना
मुंबई विमानतळावरील वर्दळ कमी झाल्याने टॅक्सीचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. सध्या दिवसाला दोन-तीन प्रवासीच मिळतात. हे परवडणारे नाही. विमानतळावरील पार्किंग खिसेकापू आहे. येथे ३० मिनिटांपर्यंत पार्किंगसाठी १६० रुपये, त्यापुढील १२० मिनिटांसाठी २५०, १८० मिनिटांसाठी ३०० आणि २४० मिनिटांसाठी ३८० रुपये आकारले जातात. त्या तुलनेत भाडे मिळत नसल्यामुळे बऱ्याच चालकांनी पाठ फिरवल्याचे टॅक्सीचालक मनिष यादव यांनी सांगितले.
.............................................