अभिनयातील वात्सल्यमूर्ती काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 06:00 AM2023-06-05T06:00:39+5:302023-06-05T06:01:07+5:30

सुलोचनादीदी यांनी जवळपास २५० मराठी-हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.  

sulochana didi latkar passed away in mumbai | अभिनयातील वात्सल्यमूर्ती काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे निधन

अभिनयातील वात्सल्यमूर्ती काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे निधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सुलोचनादीदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (वय ९४) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ८ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुलोचनादीदींच्या पश्चात मुलगी कांचन घाणेकर, नात आणि नातजावई पराग आजगावकर असा परिवार आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांसाठी आदर्शवत असणाऱ्या सुलोचना यांनी कृष्णधवल युगात आपल्या बहारदार अभिनयाची कमाल दाखवत रसिकांचे मनोरंजन केले आहे. सुलोचना यांनी जवळपास २५० मराठी-हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.  

सुलोचनादीदींना १९९९ मध्ये ‘पद्मश्री’, तर २००९ मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.  गाजलेले चित्रपट  ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’, ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘साधी माणसं’, ‘कटी पतंग’, ‘आशा’, ‘गुलामी’. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांसाठी आदर्शवत असणाऱ्या सुलोचना यांनी कृष्णधवल युगात आपल्या बहारदार अभिनयाची कमाल दाखवत रसिकांचे मनोरंजन केले आहे. सुलोचना यांनी जवळपास २५० मराठी-हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.  

अफलातून निरीक्षणशक्ती... सुलोचना यांनी देव आनंद यांच्यासोबत दोन-तीन सिनेमांमध्ये काम केले. देव आनंद नेहमी सकाळची शिफ्ट घ्यायचे. नऊ वाजता ऑफिसला जायचे. तासाभराने मेहबूबमध्ये शूटिंगला जायचे. शूट झाल्यानंतर ते केवळ लंच ब्रेकमध्येच बाहेर जायचे. सीन झाल्यावर एका बाजूला बसून पुस्तक वाचायचे, असे सुलोचना यांनीच सांगितले होते.

१९६२ साली पानशेतचा प्रलय झाला तेव्हा सुलोचनादीदी पुण्याला आल्या होत्या. तेव्हा त्या ‘जीवाचा सखा’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोल्हापूरला जात होत्या. तेव्हा आमच्या पूना गेस्ट हाउसला उतरल्या होत्या. तेव्हा माझे वडील चारुदत्त यांनी त्यांना सांगितले की, आता तुम्ही कुठेही जायचे नाही. तेव्हापासून माझ्या वडिलांशी सख्ख्या भावासारखं नातं जपलं होतं. - किशोर सरपोतदार, दिग्दर्शक

सुलोचनादीदी गेल्या. आता काय बोलू ! मी काही बोलण्याच्या अवस्थेतच नाहीय. खूप मोठा धक्का मला बसलाय. त्या माझ्या बहीणच होत्या. त्यांनी केवळ मदतच केली नाही तर त्या खंबीरपणे पाठीशी उभ्या राहायच्या. त्यांचे आणि माझे नाते तर खूपच अतूट होते. आता आम्ही फोनवर बोलायचो. तेव्हा त्या मला म्हणायच्या, अगं तुला भेटायला यायचे आहे; पण तब्येत बरी नाही. कशी येऊ? हेच आमचे शेवटचे बोलणे झाले. - लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेत्री

सुलोचनादीदी या माझ्या आईच होत्या. माझे मायेचे छत्र हरवले आहे. त्या अतिशय कुटुंबवत्सल होत्या. माझ्या तर त्या गुरु आणि आई होत्या. त्यांनी मला खूप काही दिलं आहे. माझे आयुष्य घडविण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्या अतिशय संस्कृतिशील, नम्र आणि समोरच्यांना प्रेरणा देणाऱ्या होत्या. मी नवीन असले तरी त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केले. मला घडवले. - आशा काळे, अभिनेत्री

राजा परांजपे यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटासाठी मी त्यांचा सहाय्यक दिग्दर्शक होतो. एडिटिंगचे काम सुरू असताना सुलोचनादीदी तिथे आल्या आणि त्यांची भेट झाली. मी हॉटेलमध्ये रहात असल्याचे समजल्यावर दीदींनी विचारले की, या मुलाला हॉटेलवर का ठेवले? याला माझ्या घरी पाठवा. खऱ्या अर्थाने त्या मायेची पाखर घालणाऱ्या माऊली होत्या. त्या जशा सोज्ज्वळ भूमिका साकारायच्या तशाच वास्तवातही होत्या. - राजदत्त, ज्येष्ठ दिग्दर्शक

आज अंत्यसंस्कार

सोमवारी सकाळी प्रभादेवीतील राहत्या घरी सुलोचनादीदींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.


 

Web Title: sulochana didi latkar passed away in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.