मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांच्यातही शेतकऱ्यांबद्दलची तीच तळमळ दिसून आली. आर.आर. पाटलांप्रमाणेच मतदारसंघातील कष्टकरी शेतकरी अन् जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न सुमन पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. सुमन पाटील या तासगाव-कवठेमंहकाळ मतदारसंघातून आमदार बनल्या आहेत.
आर.आर.पाटील हे अतिसंवेदनशील नेते आणि सातत्याने गोरगरीब जनतेचा व गावकडच्या माणसांचा विचार करणारं नेतृत्व होतं. राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, पोलीस भरती, डान्सबारबंदी यांसारखे अनेक निर्णय आजही उदारणादाखल सांगितले जातात. शुक्रवारी विधानसभेत दिवंगत आर.आर.पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांचा आवाज घुमला. त्यावेळी, त्यांच्यातही शेतकरी आणि गावकडच्या माणसांबद्दलची तळमळ दिसून आली.
शेतकऱ्यांना आपली जनावरे कवडीमोल भावाने विकावी लागतील, त्यामुळे तासगाव तालुक्यात तात्काळ चारा छावणी सुरु करण्याची मागणी सुमन पाटील यांनी केली. सरकारने अद्यापही कुठिलीही योजना सुरू केली नाही. त्यामुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तालुक्यातील अनेक गावांचे मिळून 22 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र कोरडवाहू असून 1500 हेक्टर द्राक्षबागेला चक्क टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. याबाबत जलसंपदा मंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन टेंभू योजनेद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सुमन पाटील यांनी केली.
अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात गारपीटीमळे हजारो हेक्टर द्राक्षबागयतदारांचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापही या शेतकऱ्यांना कुठलिही मदत मिळाली नाही. त्यामुळे सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी तळमळीची भावना सुमन पाटील यांनी विधानसभेत मांडली.