स्वामी समर्थ श्रीवरही सुनीतचाच कब्जा, सागर कातुर्डेला उपविजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 05:19 PM2018-03-13T17:19:40+5:302018-03-13T17:19:40+5:30

मुंबई श्री, महाराष्ट्र श्रीवर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केल्यानंतर सुनीत जाधवने स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतही आपलीच ताकद दाखवली.

Sumeet Jadhav Win Swami Samarth Shree | स्वामी समर्थ श्रीवरही सुनीतचाच कब्जा, सागर कातुर्डेला उपविजेतेपद

स्वामी समर्थ श्रीवरही सुनीतचाच कब्जा, सागर कातुर्डेला उपविजेतेपद

Next

मुंबई - मुंबई श्री, महाराष्ट्र श्रीवर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केल्यानंतर सुनीत जाधवने स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतही आपलीच ताकद दाखवली. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीमुळे दिमाखदार झालेल्या या स्पर्धेत माजी महाराष्ट्र श्री विजेत्या सागर कातुर्डेला उपविजेतेपदाचा मान मिळाला.

प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा दाखवून दिले, स्पर्धेचे दिमाखदार आयोजन कसे करावे. स्वामी समर्थ श्रीच्या अत्यंत भव्य आणि दिव्य आयोजनामुळे या स्पर्धेला क्रीडाप्रेमींची अलोट गर्दी उसळली होती. प्रत्येक गटात एकापेक्षा एक सरस खेळाडू असल्यामुळे क्रीडाप्रेमींना शरीरसौष्ठव स्पर्धेचा जबरदस्त पीळदार थरार प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. या स्पर्धेत सुनीत जाधवचे खेळणे निश्चित नव्हते, परंतु क्रीडाप्रेम़ी आणि आयोजकांच्या आग्रहाखातर त्याने शेवटच्या क्षणी आपले नाव नोंदवले. सुनीतला आव्हान देण्यासाठी अक्षय मोगरकर, सुजन पिळणकर, सकिंदर सिंग आणि सागर कातुर्डे आधीपासून सज्ज होते. या स्पर्धेला राज्यभरातून 79 खेळाडूंची उपस्थिती लाभली. यात मुंबई, उपनगरसह ठाणे, पुणे, रायगड मधील खेळाडूंचाही मोठा सहभाग होता.

प्रत्येक गटात झालेल्या संघर्षानंतर सुनीतची गाठ  अन्य सहा जणांशी पडली खरी पण स्पर्धा तोच जिंकणार हे गटातच निश्चित झाले होते. कारण 85 किलोवरील गटातच स्पर्धेचा विजेता ठरणार होता. या गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू अक्षय मोगरकर, मुंबई श्री सुजन पिळणकर आणि मुंबई श्रीचा उपविजेता सकिंदर सिंग हे तिघे होते, पण या तिघांपैकी कुणाचाही सुनीतसमोर निभाव लागला नाही. सुनीतने स्वामी समर्थ श्री स्पर्धेवर सहजगत्या आपले नाव कोरत गेले 3 महिने सतीश शुगर क्लासिक, एनएमएसए श्री,महाराष्ट्र श्री स्पर्धा जिंकून सुरू असलेली आपली विजयाची मालिका कायम ठेवली. गेल्यावर्षी फक्त तळवलकर्स क्लासिकमध्ये सुनीतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

सात गटात दीड लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव करणाऱया स्वामी समर्थ श्री स्पर्धेत विजेत्या सुनीतला रोख 51 हजारांसह आकर्षक चषकाने गौरविण्यात आले. या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा खासदार राहुल शेवाळे, शिवसेना विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, निशिकांत शिंदे, शरीरसौष्ठव संघटनेचे मदन कडू, सुनील शेगडे यांच्यासह स्वामी समर्थचे अध्यक्ष ऍड. रामदास गावकर, स्पर्धा प्रमुख जयराम शेलार आणि स्पर्धेचे आयोजक आणि मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

स्वामी समर्थ श्री 2018 चा निकाल

55 किलो वजनी गट -  1. संदेश सकपाळ (उपनगर), 2. नितीन शिगवण (उपनगर), 3. राजेश तारवे (मुंबई), 4. रमेश जाधव (ठाणे), 5. सचिन लोखंडे (उपनगर).

60 किलो - 1. नितीन म्हात्रे (प.ठाणे), 2. बप्पन दास (उपनगर), 3. तुषार गुजर (उपनगर), 4. गणेश काशिक (मुंबई). 5. शंतनू पांढरकर (पुणे).

65 किलो -  1 आदित्य झगडे (उपनगर), 2. प्रतिक पांचाळ (उपनगर), 3. वैभव महाजन (रेल्वे), 4. जगदिश कदम (उपनगर), 5. विनायक गोळेकर (उपनगर).

70 किलो -  1. श्रीनिवास वास्के (पुणे), 2. श्रीनिवास खारवी (प. ठाणे), 3. विशाल धावडे (उपनगर), 4. विनायक  लोखंडे (पालघर), 5. चिंतन दादरकर (मुंबई).

75 किलो -  1. रितेश नाईक (पालघर), 2. रविंद्र वंजारी (जळगाव), 3. विघ्नेश पंडित (उपनगर), 4. रोहन गुरव (उपनगर), 5. अमोल गायकवाड (उपनगर).

80 किलो -  1. सागर कातुर्डे (उपनगर), 2. सुशील मुरकर (उपनगर), 3. सुशांत रांजणकर (मुंबई), 4. सुधीर लोखंडे (उपनगर), 5. प्रशांत परब (उपनगर).

85  किलोवरील - 1. सुनीत जाधव (मुंबई), 2. अक्षय मोगरकर (ठाणे), 3. सुजन पिळणकर (मुंबई), 4. सकिंदर सिंग (उपनगर), 5. रसेल दिब्रिटो (उपनगर).

उपविजेता -  सागर कातुर्डे ( उपनगर)

स्वामी समर्थ श्री -  सुनीत जाधव (मुंबई)

Web Title: Sumeet Jadhav Win Swami Samarth Shree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.