Join us

मुंबईकरांना उन्हाचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल व किमान तापमान वाढू लागले असून, या वाढत्या तापमानाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल व किमान तापमान वाढू लागले असून, या वाढत्या तापमानाचा फटका आता मुंबईकरांना बसू लागला आहे. कमाल तापमानाची नोंद ३५ अंश एवढी होत असून, किमान तापमानही २२ अंशांच्या घरात नोंदविण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत मुंबईत रखरखीत ऊन पडत असून, गरम वारे मुंबईकरांना आता अधिकच तापदायक ठरत आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता मुंबईसह राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता त्यानंतर मुंबई आणि राज्यातील बहुतांश शहरांतील किमान तापमानात वाढीची नोंद घेण्यात येत आहे. मुंबईत कमाल तापमान ३५ अंश एवढे नोंदवण्यात येत असून, येथे वाहणारे वारे स्थिर होण्यास दुपार होत आहे. हे वारे दुपारी स्थिर होत असल्याने ते तापत आहेत. या तप्त वाऱ्यांमुळे मुंबईकरांना उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत.

-----

रविवारी मुंबईत सकाळी साडेअकरा वाजता कमाल तापमानाची नोंद ३५ अंश सेल्सिअस एवढी झाली आहे. कमाल तापमानात आता उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, हे कमाल तापमान ३७ अंशांच्या आसपास पोहोचेल. त्यामुळे मुंबईकरांना सुरुवातीलाच उन्हाचे चटके बसण्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे.