मुंबई : कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर ओसरत असला तरी देखील १९ ते २१ ऑक्टोबर या काळात गोव्यासह संपुर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २२ ऑक्टोबर रोजी कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईचा विचार करता १९ आणि २० ऑक्टोबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या वादळ पुर्वानुमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीजवळ पश्चिमेकडे वायव्य दिशेला सरकले. आणि ते समुद्राच्या पूर्वमध्य आणि ईशान्य भागात प्रभावी राहीले. ते पुढे वायव्य पश्चिम भागात सरकले. आणि अरबी समुद्राच्या मध्य पूर्व तसेच ईशान्य भागात प्रभावी होते. अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहत होते. दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी २५ किमी वेगाने वारे वाहले. अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात तर मध्य आणि वायव्य भागात समुद्र खवळलेला होता. दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर लाटा धडकल्या. अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात तर मध्य आणि वायव्य भागात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला होता.