मुंबई : मुंबईसह राज्याला उन्हाळ्याची चाहूल लागली असून, गुरुवारी राज्यभरातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ३५ अंशावर नोंदविण्यात आले आहे. मालेगाव, परभणी आणि सोलापूरच्या कमाल तापमानाने तर ३७ अंशाचा आकडा गाठला आहे. पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान याच पद्धतीने उसळी घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गेल्या महिन्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसासह गारपिटीने थैमान घातले होते. तर आता वैशाख वणव्याप्रमाणे कमाल तापमान वाढू लागले आहे. मुंबईत तर दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असे दुहेरी वातावरण होते. आता यातही बदल होतील, अशी शक्यता आहे.
मुंबईत नोंदविण्यात येणारे ३३ अंश हे कमाल तापमान सर्वसाधारण आहे. उन्हाळ्याची आता चाहूल लागत आहे. पुढील ३ ते ४ दिवस ३३ ते ३४ अंश कमाल तापमान नोंदविले जाईल. किमान तापमान २० ते २१ अंश राहील. चार ते पाच दिवसांनी हवामानात पुन्हा बदल होतील. - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग