मुंबई : कडक उन्हाळ्याने हैराण मुंबईकरांना यंदा पाण्याचे टेन्शन मात्र घ्यावे लागणार नाही. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सद्य:स्थितीत तलावांमध्ये ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जुलै अखेरीपर्यंत मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही.मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असतो. वर्षभर मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित असते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांमध्ये गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. यामुळे यंदा पावसाळ्याला सुरुवात होईपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी तलवांमध्ये मुबलक पाणी आहे.गतवर्षी याचवेळी चार लाख ९० हजार दशलक्ष लीटर जलसाठा शिल्लक होता, तर यंदा चार लाख ८० हजार दशलक्ष लीटर जलसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा अजून तीन महिने पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईत सध्यातरी पाणीकपात केली जाणार नाही, असे जल अभियंता खात्यातील एका अधिकाºयाने स्पष्ट केले.मुंबईला अपर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो.मुंबईत पाण्याची दररोजची मागणी साडेचार हजार दशलक्ष लीटर आहे. दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होता. यापैकी ३७५० दशलक्ष लीटर पाणी मुंबईसाठी तर उर्वरितलीटर पाणी ठाणे, भिवंडी आणि निजामपूरला पुरवले जाते. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सात धरणांव्यतिरिक्त गारगाई, दमणगंगा व पिंजाळ ही तीन धरणे बांधण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
उन्हाळ्यातही मुंबईला पाण्याचे नो टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 5:18 AM