यंदाचा उन्हाळा घाम फोडणार; राज्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 02:14 AM2021-02-25T02:14:27+5:302021-02-25T06:39:27+5:30
हिवाळा संपला; राज्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ
मुंबई : मुंबईसह राज्यभरात किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले असून, किमान तापमानाची नोंदही १६ अंशांच्या आसपास होत आहे. कमाल आणि किमान तापमानात बराच फरक नोंदविण्यात येत असला, तरी कमाल तापमानाने घेतलेली उसळी निश्चित तापदायक मानली जात आहे.
वातावरणात होत असलेले बदल नागरिकांना घाम फोडणार आहेत. दरम्यान, कमाल तापमान एवढे नोंदण्यात आल्याने राज्यातील हिवाळा आता परतू लागल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यभरात कमाल तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३६ एवढे नोंदविण्यात आले असून, या शहरांमध्ये वेंगुर्ला, जळगाव, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, वाशिम, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. दुसरीकडे बहुतांशी शहरांचे किमान तापमान १६ ते २० अंश दरम्यान नोंदविण्यात येत आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईची दुपार तापदायक
मुंबई कमाल तापमानही ३४ ते ३६ अंश नोंदविण्यात येत असून, मुंबईची दुपार तापदायक असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः दुपारी मुंबईत गरम वारे वाहत असून, गरम वाऱ्यांमुळे मुंबईकरांना किंचित का होईना, उन्हाचे चटके बसू लागले आहेत.
समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब लागतो आणि या विलंबामुळे हे वारे दुपारी स्थिर होत असल्याने ते तप्त होतात. या गरम वाऱ्यांमुळे कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येते, अशी माहिती हवामान खात्याने दिआली. वातावरणीय बदलामुळे तापमान अधिकाधिक वाढत असून, यंदाचा उन्हाळाही तेवढाच तापदायक असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दर वर्षीच्या उन्हाळ्यात मुंबईसह राज्यभरातील शहरांचे कमाल तापमान ३६ ते ४० दरम्यान नोंदविण्यात येते.