महावितरण; २ कोटी ८० लाख ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उन्हाळ्यामुळे येत्या एप्रिल व मे महिन्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ होणार असल्याने सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा चढू लागला असून, उन्हाळा घाम काढू लागला आहे. याचा प्रत्यय सुरुवातीलाच आला असून, नुकेतच मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात व महावितरणच्या कार्यक्षेत्रात २२ हजार ३३९ मेगावॉट विजेची आजवरची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. या मागणीप्रमाणे नियोजनातून वीजपुरवठा करून महावितरणने उच्चांकी वीजपुरवठ्याचा विक्रमी टप्पा गाठला.
राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढायला सुरुवात झाली आहे. सोबतच प्रामुख्याने कृषिपंपांद्वारे विजेचा वापर वाढला आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ हाेत आहे. नुकतेच राज्यासह मुंबईत २५ हजार २०३ मेगावॉट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे २ कोटी ८० लाख ग्राहकांना उच्चांकी २२ हजार ३३९ मेगावॉट विजेचा अखंडित पुरवठा करण्यात आला. कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. दरम्यान, १९ फेब्रुवारी २०२० रोजी उच्चांकी मागणीप्रमाणे आतापर्यंत २१ हजार ५७० मेगावॉट विजेचा विक्रमी पुरवठा केला होता. मात्र मंगळवारी हा विक्रम मोडीत निघाला.
* दीर्घकालीन करारानुसार महावितरणला प्राप्त वीज
- महानिर्मितीकडून ७७६१ मेगावॉट, एनटीपीसी व एनपीसीआयएल ४२१६ मेगावॉट, अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्को आदींकडून ४२०२ मेगावॉट, सौर ऊर्जेद्वारे १९७४, नवीन व नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांतून ३१६२, कोयना, घाटघर व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १७४०, पॉवर एक्सचेंजमधील खरेदीसह मुक्त ग्राहक वीजनिर्मिती स्त्रोताद्वारे १२५८ मेगावॉट.
........................