Join us

कोरोनातील बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणी BMC उपायुक्त रमाकांत बिरादार यांना समन्स

By मनीषा म्हात्रे | Published: August 25, 2023 9:22 PM

सोमय्यांच्या तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करत मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन पालिका अधिकाऱ्यांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मुंबई - कोविड काळात मृतदेहांसाठी वापरण्यात आलेल्या बॅग्जच्या खरेदी घोटाळ्याप्रकरणी पालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. या समन्सनुसार बिरादार यांना शनिवारी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

कोविड केंद्र उभारणी, वैद्यकीय उपकरणे, साहित्य, औषध खरेदी, डाॅक्टर पुरवठा अशा विविध कंत्राटांमध्ये मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांत केली होती. यामध्ये, बॉडी बॅग खरेदी ही वाढीव किंमतीने करण्यात आल्याचा आरोप आहे. सोमय्यांच्या तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास करत मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन पालिका अधिकाऱ्यांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मुंबई महापालिकेत लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पालिकेचे मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण निविदा प्रक्रिया राबवते. या खात्याची सुत्रे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे तर, जबाबदारी उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्याकडे होती. कोविड काळात याच कार्यालयाकडून विविध वैद्यकीय उपकरणे, साहित्य, आैषधे, ऑक्सिजन, बाॅडी बॅग आणि इतर साहित्य खरेदी करण्यात आले होते. याच, प्रकरणात चौकशीसाठी त्यांना शनिवारी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे चौकशीत काय समोर येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दीड हजारांची बॅग ६ हजार ८०० लायापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात मृत कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग दिड ते दोन हजार रुपयांत उपलब्ध असताना त्याची ६ हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचे समोर आले आहे. तसेच, किशोरी पेडणेकर यांच्या कार्यकाळात हे कंत्राट दिल्याचा आरोप आहे. याबाबत ईडी कडूनही तपास सुरु आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका