हितेन नाईक -पालघर : वडराई येथील केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयात ११च्या विद्यार्थ्यांकडून १०वी इयत्तेतील ३५ विद्यार्थ्यांना शिक्षेच्या रूपात मारहाण करून रॅगिंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल पालघर पोलिसांनी घेतली असून याप्रकरणी सुमोटो दाखल करण्याबाबत पोलिस प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे.वडराई येथील नवोदय विद्यालयात ३० सप्टेंबर रोजी अकरावीतील सहा ते सात विद्यार्थ्यांनी रात्री ११ वाजता विद्यालयातील उदयगिरी हाऊसमध्ये दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत म्हणून बोलाविले होते. यावेळी विद्यार्थ्यांना उभे करून त्यांच्या कानफटीत मारून एका विद्यार्थ्यांचा गुप्तांगांवर लाथ मारण्यात आली तर भोईर आणि निखिल सिंग या विद्यार्थ्याच्या कानफटीत मारल्याने त्याच्या कानाला गंभीर इजा झाली. पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या पालकांची संपर्क साधला असता शाळेतून चौकशी समिती नेमल्याने आम्हाला तक्रार करायची नसल्याचे सांगितले; परंतु हा प्रकार गंभीर असल्याने शाळा व्यवस्थापन समिती, पालक, यांच्याशी चर्चा करून याप्रकरणी सुमोटो दाखल करण्याबाबत पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण शाळेत जाणार असल्याचे सपोनि ढोले यांनी सांगितले.
या घटनेची माहिती शाळा व्यवस्थापनाला माहिती असतानाही त्यांनी याबाबत कुठलेही गंभीर पाऊल उचलले नव्हते. उलट या प्रकाराबाबत कोणालाही सांगायचे नाही, असा दम विद्यार्थ्यांनी त्यांना भरला, मात्र, एका विद्यार्थ्यांचा कान जास्त दुखू लागल्याने ही बाब पालकांना समजल्यावर पालकांनी नवोदय विद्यालयात धाव घेतली तेव्हा मारहाण आणि रॅगिंगचा प्रकार समोर आला. उपचारानंतर विद्यार्थी विद्यालयात आल्यावर याची तक्रार प्राचार्यांकडे करण्यात आली. त्यावेळी झालेल्या प्रकार चुकीचा असून आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आता तुम्ही परीक्षा असल्यामुळे परीक्षेची तयारी करा, असे उत्तर प्राचार्यांनी त्यावेळी विद्यार्थ्यांना दिले.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांची शाळेला भेट सातपाटी सागरी पोलिस ठाण्याचे सपोनि प्रेमनाथ ढोले यांनी नवोदय विद्यालयात जाऊन प्राचार्य जॉन अब्राहम यांची भेट घेतली असता दखल घेण्यासारखा प्रकार नसल्याचे सांगून आम्ही एक चौकशी समिती नेमल्याची पोलिसांना सांगितले.