सन आयलाय गो, नारळी पुनवेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:23 AM2017-08-06T04:23:56+5:302017-08-06T04:24:10+5:30
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा नारळी पौर्णिमेचा सण म्हणजे, कोळी बांधवांसाठी जिव्हाळ्याचा विषय. थोडक्यात, नारळी पौर्णिमा म्हणजे कोळ्यांच्या बोली भाषेत ‘नारली पुनव’; ज्याला
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा नारळी पौर्णिमेचा सण म्हणजे, कोळी बांधवांसाठी जिव्हाळ्याचा विषय. थोडक्यात, नारळी पौर्णिमा म्हणजे कोळ्यांच्या बोली भाषेत ‘नारली पुनव’; ज्याला आपण ‘थँक्स गिव्हिंग डे’ असेही म्हणू शकतो. कारण या दिवशी कोळीराजा दर्या- सागराला नारळ अर्पण करून त्याचे आभार व्यक्त करतात.
आज मुंबईत सर्वत्र काँक्रीटचे जंगल उभे राहिले असताना, देशात केरळनंतर मासेमारीत दुसरा क्रमांक असणाºया वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा आणि संस्कृती जपली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून ७ किमी अंतररावर असलेल्या वेसावे कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा अगदी पारंपरिक थाटात साजरी केली जाते. या वर्षीची नारळी पौर्णिमा उत्सवाची मिरवणूक सोमवारी खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे, सकाळी १०च्या सुमारास वेसावे कोळीवाड्यातून निघणार आहे. मात्र, दरवर्षी सायंकाळी ५नंतर येथील नारळी पौर्णिमेच्या मिरवणुका निघतात आणि मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत, सोन्याचा मुलामा दिलेला नारळ समुद्राला अर्पण केला जातो.
येथील सणाच्या आगमनाची जोरदार तयारी कोळी बांधवांनी केलेली असते. कारण १ जूनपासून बंद असलेल्या मासेमारीला आता या उत्सवानंतर सुरुवात होणार आहे. नव्या मासेमारीच्या मोसमाला वेसावकर सज्ज झाले असून, मासेमारीच्या होड्यांची रंगरंगोटी, झेंडे-पताक्यांची सजावट व महिलांनी तयार केलेल्या चवदार नारळाच्या (पुरण्या) करंज्या हे येथील वैशिष्ट्य असल्याचे, मच्छीमार नेते राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांच्यासह एमबीएचा विद्यार्थी मोहित रामले यांनी सांगितले. दरम्यान, यंदाची मानाची हंडी फोडण्याचा मान वेसाव्यातील बाजार गल्ली कोळी जमातीला मिळाला आहे, असे या गल्लीचे अध्यक्ष पराग भावे यांनी सांगितले.
वेसाव्यातील ९ प्रमुख गल्ल्या, तसेच इतर काही उपगल्ल्या वाजत-गाजत मानाचा सोन्याचा नारळ घेतात. कोळी बँडबाज्यासकट मिरवणुकीत सहभागी होतात. काही जण तर पारंपरिक कोळी पेहरावात सज्ज होत आनंद द्विगुणाने वाढवितात. सोन्याचा मुलामा दिलेला नारळ समुद्राला अर्पण करण्याचा मान गल्लीतील अध्यक्षाला असतो. नारळ मिरवणूक बंदरावर पोहोचली की, सर्व जण नारळाची व दर्या सागराची आरती ओवाळतात आणि शांत होऊन मासेमारीला यश मिळण्यासाठी सागराला साकडे घातले जाते. विशेष म्हणजे, वेसावे गावात सागराला शहाळीचा नारळ अर्पण केला जातो. सोन्याच्या नारळाबरोबरच घरोघरचे सदस्य, आपल्या कुटुंबाचा नारळ घेऊन मिरवणुकीत सहभागी होतो.
- भगवान भानजी, कोळी समाजाचे अभ्यासक