Join us

सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:08 AM

- सुहास जावडेकरभारतीय संस्कृतीत सूर्यनमस्काराला खूप महत्त्व आहे. मुळात नमस्कार हीच भारतीय संस्कृतीची ओळख आहे. हल्लीच्या जगात आपण ...

- सुहास जावडेकर

भारतीय संस्कृतीत सूर्यनमस्काराला खूप महत्त्व आहे. मुळात नमस्कार हीच भारतीय संस्कृतीची ओळख आहे. हल्लीच्या जगात आपण हाय, हॅलो म्हणतो. मात्र, नमस्काराचे मूल्य कायम आहे, तसेच आपल्यापैकी अनेक जण व्यायामासाठी जीम किंवा योगा वर्गांना जातात. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतेच. मात्र कमी वेळात, कमी जागेत आणि कमी खर्चिक असा सर्वांगसुंदर व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. मुळातच सूर्यनमस्कार ही एक सर्वोत्तम उपासनाही आहे आणि त्याला आपल्या देशात, राज्यात फार मोठी परंपराही आहे.

...................................

इसवी सन ६९० मध्ये हर्षवर्धनाने सूर्याला नमस्कार घातल्याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर महाराष्ट्रात श्री समर्थ रामदास स्वामींनी चारशे वर्षांपूर्वी सूर्यनमस्कार घातले होते, याचा उल्लेख अनेक ठिकाणी आहे. सुरुवातीला मारुती आणि राममंदिरात जे संस्कारवर्ग सुरू झाले होते, त्यात सूर्यनमस्कार हा अतिशय महत्त्वाचा भाग होता. साधारण १९२२ च्या अलीकडे किंवा पलीकडे साताऱ्यातील मसूर गावचे विश्वनाथ मसूरकर महाराज यांनी सूर्यनमस्कार मोठ्या प्रमाणात घालायला सुरुवात केली. औंधचे राजे स्वत: सूर्यनमस्कार घालत असत आणि त्यांच्या राज्यातील शाळांमध्ये मुलांनी सूर्यनमस्कार घालणे अनिवार्य असे.

१९२५ नंतर रा. स्व. संघाच्या शाखांमधून आपल्याला सूर्यनमस्काराची परंपरा दिसते आणि गेली ५० वर्षे तर सूर्यनमस्काराचा सुवर्णकाळ म्हणता येईल. १९७० नंतर सूर्यनमस्काराचे महत्त्व वाढले आणि बहुतांश जण ते करू लागले. योग दिन सुरू झाला तेव्हापासून तर जगभर सूर्यनमस्कार मोठ्या संख्येने घातले जात आहेत. दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा १९ फेब्रुवारी रोजी सूर्यनमस्कार दिन आहे.

सूर्यनमस्कार हा एक आपादमस्तक व्यायाम प्रकार आहे. यात शरीराच्या अंतर्गत रचना आणि बहिर्गत रचना या सगळ्यांना व्यायाम होतो आणि ऊर्जा मिळते. या सूर्यनमस्कारांत माणसाच्या केसापासून ते तळव्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाचा सहभाग असतो. यातील प्रत्येक नमस्कारात कुंभक, पूरक (श्वास घेणे), रेचक (श्वास सोडणे) असे तीनही प्रकार होत असल्याने फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. शुद्ध रक्तपुरवठा वाढतो, व्यक्ती अधिक कार्यप्रवण होते, उत्साही राहते.

सूर्यनमस्कार करताना पूर्वेकडे तोंड करावे, उगवत्या सूर्यासमोर नमस्कार घालणे अधिक उचित असते. अन्यथा सूर्योदयाआधीची ९६ मिनिटे आणि सूर्योदयानंतरची २४ मिनिटे अशा दोन तासांच्या काळात सूर्यनमस्कार घालावे, तेही शक्य न झाल्यास सूर्यास्तानंतर म्हणजे संधी प्रकाशाच्या वेळेत (महाराष्ट्रात सूर्यास्तानंतर १८-१९ मिनिटांनी संधी प्रकाश असतो) सूर्यनमस्कार घालावे. सैलसर कपडे घालावेत. शक्यतो सूर्यनमस्काराच्या आधी आणि नंतर ३० मिनिटे काहीही पचनास जड पदार्थ खाऊ नयेत. सूर्यनमस्कार कोणालाही एकदम सगळे करता येत नाहीत. अनेक जण दहा आकड्यांचे नमस्कार घालतात. कोणी १२, तर ३६ आकड्यांचेही घालतात. मात्र, १० आकड्यांचे नमस्कार जगभर घातले जातात. या नमस्कारातील दहा स्थिती म्हणजेे पूरक योगासन, हस्तपादासन, आडव आसन, भुजंगासन, साष्टांगासन, सर्पासन, पर्वतासन, आडव आसन, हस्तपादासन, सहज आसन या आहेत. सूर्यमस्कार करण्यासाठी कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही, आपले शरीर हेच साधन आणि पाच-सहा फूट जागा इतकेच पुरेसे आहे. सूर्यनमस्कार सातत्याने सुरू ठेवले तर शरीराचा बांधाही सडपातळ राहतो.

सूर्यनमस्कार इतका सोपा आणि त्याचे इतके फायदे असूनही अजूनही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात दररोज घातला जात नाही, याची मात्र खंत आहे. मी गेली ३०-३५ वर्षे शिवथरघळ आणि ठाण्यात सूर्यनमस्कार शिकवतो. दरवर्षी माझे सुमारे १०० विद्यार्थी असतात. त्यातील दररोज नमस्कार करणारे १० टक्केच असतात आणि वर्षअखेरीस सातत्याने आणि व्यवस्थित करीत राहणारे त्याच्याही १० टक्केच असतात हे सत्य आहे. त्यामुळे गेल्या इतक्या वर्षांत मी ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असले तरी ते सगळेच उत्तम सूर्यनमस्कार घालीत असतील असे नाही. मुळातच सूर्यनमस्कार किंवा कोणताही व्यायामप्रकार हा शरीर सुदृढ ठेवण्यासाठी केला जातो. मात्र मला तर वाटते सुदृढ शरीरासाठी हे प्रकार करण्याआधी शरीर बिघडविण्यासाठी आपण हल्लीच्या काळात जे काही करतोय (उदा. उशिरा झोपणे, उशिरा उठणे, बाहेरचे जंक फूड खाणे, जास्त वेळ मोबाइल, टीव्ही पाहणे, सूर्यनमस्कार करण्यास कंटाळा करणे) ते आधी थांबविले पाहिजे.

सूर्यनमस्कार कधी करू नये -

डोकं दुखत असेल तर

खूप ताप असेल तर

स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात ते टाळावे; पण यातीलही बैठ्या स्वरूपात केवळ श्वासाची स्थिती केली तरी हरकत नाही. शारीरिक हालचाल मात्र करू नका; पण आपल्याला होत असलेल्या त्रासाचा अंदाज घेऊनच ठरवावे.

(लेखक शिवथरघळ आणि विकास संस्था येथे सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देतात.)

(शब्दांकन : स्नेहा पावसकर)