यंदाही सूर्य आग ओकणार; मुंबईही तापली, थंडी पळताच तापमान ३७ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:06 AM2022-03-04T08:06:50+5:302022-03-04T08:07:29+5:30
मुंबई शहर आणि उपनगरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : थंडीने मुंबईतून आता काढता पाय घेतला आहे. याचाच परिणाम मुंबई शहर आणि उपनगरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी तर मुंबईत ३७.१ अंश एवढे तापमान नोंद झाले. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी कुलाबा येथे ३३ व सांताक्रूझ येथे ३७.१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे. ३ मार्च हा उष्ण दिवस ठरला आहे. आतापर्यंत मार्चमधील नोंदी पाहिल्या तर या काळात तापमानात वाढ नोंदविण्यात येते. जेव्हा एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो तेव्हा तापमानात असे बदल होत असतात.
- अरबी समुद्राहून मुंबईकडे वाहणारे वारे सकाळी स्थिर झाल्यास ते तापत नाहीत. हेच वारे स्थिर होण्यास दुपार झाली तर ते तापतात.
- वारे तापल्याने मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येते. सध्या या कारणासह ऋतू बदलामुळे मुंबईच्या तापमानात वाढ नोंदविण्यात येईल.
५ ते ८ मार्च दरम्यान महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका अधिक जाणवेल. ९ व १० मार्च दोन दिवस काहीसा दिलासा मिळून शुक्रवार, ११ मार्चपासून पुन्हा तापमान वाढीची शक्यता आहे. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ