लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वेगाने गोल गोल वाहणारे वारे, सोबत उडणारी धूळ, झाडांच्या पानांचा नुसताच सळसळाट आणि अधूनमधून पडणारे टपोरे थेंब, असे वातावरण सध्या मुंबई परिसरात आहे. मात्र, मुंबईत उकाडा कमी होत नसल्याचे दिसत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत ताशी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून किरकोळ ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी दोन दिवस अशाच काहीशा वातावरणाला सामोरे जावे लागणार आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर सतर्कता
मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात सुरुवात केली आहे. त्यानुसार नागरिकांची मोठी गर्दी होणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय जुहू चौपाटी येथील घटनेनंतर हा समुद्रकिनारा काही काळासाठी बंददेखील करण्यात आला आहे.
- वादळाच्या शक्यतेने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतल्या सर्व समुद्रकिनाऱ्यावर पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपोरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून वेगवान वारे वाहत आहेत.
- सध्या वाऱ्याचा वेग ताशी ५० किलोमीटर असून मंगळवारी संपूर्ण दिवस मुंबईत वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे शहरात धूळ उडत आहे.
- मंगळवारी पावसाचा लपंडाव सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता. सायंकाळी सहा वाजता वेगाने वारे वाहत असताना काही ठिकाणी आलेल्या मोठ्या सरींनी मुंबईकरांना गारेगार केले.
- दिवसभर काही काळ ढगाळ वातावरण, काही काळ पाऊस आणि या बदलणाऱ्या वातावरणामुळे उकाड्यामध्ये होणारी वाढ, असे काहीसे हवामान मुंबईत मंगळवारी पाहण्यास मिळाले.