मुंबई : कोरोनाशी दोन हात करतानाच आता मुंबईसह महाराष्ट्रात उत्सवांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव तर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासह गणेशमूर्तींची उंची कमी ठेवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाददेखील उत्तम मिळत असतानाच आता कुर्ला येथील मूर्तिकार राहुल राजेंद्र घोणे यांनी घडवलेली गणपती बाप्पाची मूर्ती येत्या दोन दिवसांत थेट अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे रवाना होणार आहे.
मुंबई येथे वास्तव्य करणारे अनिल मोघे आणि लीला मोघे यांचे सुपुत्र चैतन्य मोघे हे कामानिमित्त अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे वास्तव्यास आहेत. चैतन्य यांच्या घरी राहुल यांनी साकारलेली मूर्ती विराजमान होणार आहे. मूर्तीचे पॅकिंग पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत ही मूर्ती विमानाने रवाना होईल. वॉशिंग्टनला किरकलँड येथे गणेशमूर्ती जाणार आहे. चैतन्य हे राहुल यांचे मित्र आहेत. चैतन्य आणि राहुल या दोघांचे बाबासुद्धा एकमेकांचे मित्र आहेत. गेल्या १५ वर्षांपासून चैतन्य अमेरिकेत आहे. गेल्या वर्षी चैतन्य यांनी राहुल यांच्या साकारलेल्या मूर्ती पाहिल्या आणि त्यानंतर राहुलकडून श्रीगणेशाची मूर्ती घेण्याचे चैतन्य यांनी ठरविले. त्यानुसार, या वर्षी पहिली मूर्ती अमेरिकेला रवाना होत आहे.राहुल राजेंद्र घोणे यांची दुसरी पिढी गणेशमूर्ती साकारत आहे. त्यांचे वडील पूर्वीपासूनच गणेशमूर्ती साकारत असून, यास ३२ वर्षे झाली आहेत. आता राहुल हे स्वत: आणि त्याची पत्नी मित्तल हे काम वडिलांसोबत करीत असून, मित्तल या आॅनलाइन आॅर्डर घेण्याचे काम पाहत आहेत. दरवर्षी मॉरिशसला राहुल यांच्या दोन मूर्ती रवाना होतात. एक मूर्ती दहा फूट आणि दुसरी मूर्ती सहा फूट असते. मात्र या वर्षी कोरोनामुळे मूर्ती लहान करण्याचे आवाहन करण्यात आल्याने यंदाचे नियोजन रद्द झाले आहे. राहुल यांच्या कार्यशाळेत चारशे प्रकारच्या मूर्ती आहेत. काही येथे साकारल्या जातात. काही बाहेरून आणल्या जातात. या वर्षी कोरोनामुळे ५० टक्के आॅर्डरच झाल्या आहेत, असे राहुल घोणे यांनी सांगितले.