मुंबई : उपनगरीय रेल्वेवरील रेल्वे रुळांसह अन्य कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. यंदा रक्षाबंधन रविवारी आल्यामुळे मुंबईकरांचा संभाव्य त्रास लक्षात घेत, मध्य आणि पश्चिम रेल्वेने दिवसा ब्लॉक रद्द केला आहे. मात्र, वसई रोड-विरार स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेणार असल्याची घोषणा पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आली.
मंबईकरांना रेल्वे प्रशासनाची भेट, पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रकालीन ब्लॉक
पश्चिम रेल्वेने वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत जंबोब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक काळात धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येतील. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले. मध्य मार्गासह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
रक्षाबंधन सणानिमित्त मेगाब्लॉक रद्द करावा आणि रविवार वेळापत्रकाप्रमाणे लोकल न चालवता, नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल फेऱ्या चालविण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. रविवारच्या वेळापत्रकानुसार सुमारे ३०० पेक्षा जास्त लोकल फेºया सुट्टीनिमित्त रद्द करण्यात येतात. यामुळे अन्य लोकलमध्ये प्रवाशांच्या गर्दीत वाढ होते. रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द केला आहे. तथापि, रक्षाबंधनाच्या दिवशी रविवार विशेष वेळापत्रक लागू करणार की नाही, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.