Join us

नववर्षाच्या स्वागताचा संडे मूड!

By admin | Published: January 02, 2017 3:52 AM

छानशी थंडी आणि पार्ट्यांची धूम अशा वातावरणात ठाणे जिल्ह्यात शनिवारी रात्रभर थर्टी फर्स्टचा जल्लोष उत्तरोत्तर रंगत गेला

ठाणे : छानशी थंडी आणि पार्ट्यांची धूम अशा वातावरणात ठाणे जिल्ह्यात शनिवारी रात्रभर थर्टी फर्स्टचा जल्लोष उत्तरोत्तर रंगत गेला. थर्टी फर्स्टच्या रात्री ठाणेकर तरूणाईने मासुंदा, उपवन तलाव, राममारूती रोड आणि परिसरात मित्रमैत्रिणींसह एकत्र येत जमके सेलिब्रेशन केले. तसाच उत्साह डोंबिवली, कल्याणसह सर्व प्रमुख शहरांत होता. नववर्षाच्या पहिल्या दिवशी रविवारची सुट्टी जोडून आल्याने मॉल, हॉटेल सलग दुसऱ्या दिवशीही तुडुंब भरली होती. सकाळच्या वेळी ठाण्यासह, कल्याण-डोंबिवली, टिटवाळा आणि परिसरातील मंदिरामध्ये अनेकांनी सहकुटुंब दर्शनासाठी गर्दी केली होती. खवय्यांच्या रांगा, चित्रपटगृहांतही गर्दीकुटुंबीय तसेच मित्रमैत्रिणींसोबत शनिवारी सायंकाळनंतर फिरायला निघालेल्या ठाणेकरांच्या गर्दीने रस्ते फुलले होते. रात्री आठनंतर मासुंदा, उपवन, कचराळी तलाव आणि परिसरात जमलेल्यांमध्ये तरूणाईची संख्या मोठी होती. डोंबिवलीत केवळ फडके रोडच नव्हे, तर अन्य प्रमुख रस्त्यांवर रात्रभर सेलिब्रेशन सुरू होते. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मीरा रोड, भाईंदर या सर्व शहरांत असाच उत्साह होता. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवार असल्याने चाकरमान्यांसह बच्चेकंपनीचा आनंद द्विगुणीत झाला होता. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक जण मंदिरांत जातात. त्यामुळे टिटवाळा, उपवन, ठाणे मार्केट, डोंबिवली येथील गणपती मंदिर, वर्तकनगर येथील साईबाबा मंदिर, शहाड येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर, अंबरनाथमधील शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.सायंकाळनंतर चित्रपटगृहेही भरली होती. मॉल, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दीमुळे खवय्यांच्या रांगा लागल्या होत्या. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता.ठाणे : पोलीस, वनविभागाच्या कारवाईमुळे येऊर परिसरातील नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांना आळा बसला. डीजेच्या आवाजावरही निर्बंध होते. त्यामुळे यंदा शांतता असल्याची माहिती पाटील पाड्यातील रहिवाशी नरेश मोरगे यांनी दिली. हा परिसर पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काटेकोर काळजी यंदा गेण्यात आली. पर्यटकांवर निर्बंध होते. दारू नेली जाणार नाही, यासाठी वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे नववर्ष स्वागताच्या नावाखालील पार्ट्यांच्या धांगडधिंग्याला आळा बसला.फॉरेस्ट गेटवर गेले तीन दिवस रात्रंदिवस वाहनांची तपासणी करण्यात आल्याने जंगलातील मोकळ्या जागेतील पार्ट्यांना आळा बसला. बंगल्यातच पार्ट्या झाल्याने मारामारी, शिवीगाळ, आरडाओरड्याला आळा बसल्याचे वनीचा पाडा, पाटीलपाडा, पाटोळपाडा, भेंडीपाडा, येऊर गावच्या रहिवाशांनी सांगितले. ठाणे, मुंबईच्या पर्यटकांनी नववर्षाचे स्वागत शांततेत केल्याचे हिराबाई खांडोरे यांनी सांगितले. येऊर आणि उपवन या परिसरात ठिकठिकाणी बंदोबस्त असल्याने मोकळ््या जागेतील पार्ट्यांना आळा बसल्याचे निसर्गप्रेमी नीतेश पांचोली यांनी सांगितले.