Join us

मुंबईकरांचा रविवार ‘ताप’दायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 5:52 AM

मुंबई शहर आणि उपनगराला उन्हाचा तडाखा बसतच असून, रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३३.९ अंश नोंदविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या दरम्यान नोंदविण्यात येत असले तरी वाहत्या उष्णतेच्या झळांनी मुंबईकर बेजार झाले आहेत.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला उन्हाचा तडाखा बसतच असून, रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३३.९ अंश नोंदविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या दरम्यान नोंदविण्यात येत असले तरी वाहत्या उष्णतेच्या झळांनी मुंबईकर बेजार झाले आहेत. उन्हाचा तडाखा बसत असतानाच वाढत्या उकाड्यानेही मुंबई घामाघूम झाली असून, यात उत्तरोत्तर आणखी भरच पडणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.सोमवारसह मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २३ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल. आकाश मुख्यत: निरभ्र राहील. ९ एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० ते १२ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :तापमान