Join us

बाप्पाच्या दर्शनासाठी साधला रविवारचा मुहूर्त;  भरपावसात भक्तांच्या रांगाच रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 12:57 AM

सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नागरिक सहकुटुंब दखावे पाहण्यासाठी बाहेर पडले होते

मुंबई : गणेशोत्सवात गणपतींसोबत मध्यवर्ती भागातील प्रतिष्ठित मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्रसिद्ध मंडळांसह इतर मंडळांचे देखावे पाहण्यासाठी लालबाग, परळ, चिंचपोकळी आणि खेतवाडी यासह आसपासच्या परिसरात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

गौरींचे आणि पाचव्या दिवसाच्या गणपतींचे झालेले विसर्जन; तसेच रविवारी शहरातील मध्यवर्ती भागात नागरिकांनी देखावे पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. पाऊस असूनसुद्धा गणेशभक्तांचा उत्साह दिसून आला. सायंकाळी सहानंतर उपनगरांतून येणाऱ्या नागरिकांचीही त्यात भर पडली. लालबागचा राजा, गणेशगल्लीच्या गणपतीसह इतर मंडळांचे दर्शन आणि खेतवाडीच्या गल्ल्यांमधील मंडळांनी केलेली विविधरूपी बाप्पाची सजावट पाहण्यासाठी नागरिकांचा जथ्था बेलबाग चौकाच्या दिशेनेच पुढे पुढे सरकत होता. गणपतींचे दर्शन, त्यांची सजावट डोळ्यांत साठवून घेण्यासह मोबाइलच्या कॅमेºयात टिपण्यासाठी धडपड सुरू होती.

सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नागरिक सहकुटुंब दखावे पाहण्यासाठी बाहेर पडले होते. चिंचपोकळी, परळ, लालबाग, करी रोड, भायखळा, गिरगाव, अंधेरी, चेंबूर या भागात राज्यभरातूनच गणशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांना गर्दी केली होती. भूक भागवण्यासाठी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर रांगा लागल्या होत्या. नागरिकांच्या गर्दीमुळे रात्री १२ वाजल्यानंतरही शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर गर्दी दिसून येत होती.‘सेल्फी’ला उधाणगणपतीसोबत आणि मंडळाच्या आकर्षक सजावटीसोबत सेल्फी काढण्यासाठी युवावर्गाची धडपड पाहायला मिळाली. तसेच गणपतीसमोर कुटुंबासमवेत सेल्फी काढण्यातही नागरिक व्यस्त होते. त्यामुळे ‘सेल्फी विथ बाप्पा’ला उधाणच आले होते. या सेल्फीमुळे गर्दी खोळंबत असल्याने पोलिसांना ध्वनिक्षेपकावरून रस्त्यावर किंवा मंडळासमोर सेल्फी न काढण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.मेगाब्लॉक नसल्याने गणेशभक्तांना दिलासाउपनगरीय रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक न घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. ठाणे, पालघर या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने गणेशभक्त मुंबईत दाखल झाल्याने रविवार गर्दीचा वार ठरला.

गौैरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर गणेशभक्तांना मुंबईतील मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती पाहण्याची ओढ लागते. रविवारचा दिवस पाहून गणेशभक्तांनी लालबाग, परळ, चिंचपोकळी, अंधेरी, वांद्रे, ग्रॅण्ट रोड, चर्नी रोड येथील गणपती मंडळांची वाट धरली. या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होती.

रेल्वे प्रशासनाच्या वतीने गणपती विशेष लोकल सोडण्यात आल्या आहेत़ गणपती दर्शन करण्यासाठी जाणाºया प्रवाशांमध्ये काही प्रवासी लोकलच्या दरवाजावर उभे राहून हुल्लडबाजी करतात. अशा प्रवाशांमुळे इतर प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. यावर रेल्वे सुरक्षा बलाद्वारे कारवाई केली जाईल का, असा प्रश्न प्रवाशांनी केला आहे.

टॅग्स :गणेश मंडळ 2019