मुंबईकरांचा रविवार जबरदस्तीने घरातच; रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर रखडपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 06:09 AM2023-02-25T06:09:01+5:302023-02-25T06:09:17+5:30
मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंड स्थानकादरम्यान दोन गर्डर टाकण्यासाठी रविवारी रात्री तीन तासांचा पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई - रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामे यासाठी रविवारी, २६ फेब्रुवारी रोजी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत.
मध्य रेल्वे
कुठे? : माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर
कधी?: सकाळी ११ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर ठाणे येथून अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
हार्बर रेल्वे
कुठे?: पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर
कधी? : सकाळी ११. ०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप आणि पनवेल येथून ठाणेकरिता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाइन सेवा उपलब्ध असेल.
पश्चिम रेल्वे
कुठे? : सांताक्रुझ ते गोरेगाव अप-डाउन जलद मार्गावर
कधी?: सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत
परिणाम : अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत जातील.
मुलुंड-नाहूरदरम्यान पॉवर ब्लॉक
मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंड स्थानकादरम्यान दोन गर्डर टाकण्यासाठी रविवारी रात्री तीन तासांचा पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मध्य रेल्वेचा सहाही मार्गिकांवर असणार आहे. त्यामुळे मेल- एक्स्प्रेस गाड्यांच्या आणि लोकल सेवा वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.
या ब्लॉकमुळे कोणार्क एक्स्प्रेस ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेशन होणार आहे. ब्लॉकपूर्वी कल्याणकडे जाणारी शेवटची कर्जत लोकल सीएसएमटीहून रात्री १२. २४ वाजता सुटते. ब्लॉकपूर्वी सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल कल्याणहून रात्री ११.५२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर कल्याणकडे जाणारी पहिली कर्जत लोकल सीएसएमटीवरून पहाटे ४. ४७ वाजता सुटते. कल्याणहून ब्लॉकनंतर सीएसएमटीकडे जाणारी पहिली सीएसएमटी लोकल कल्याणहून संध्याकाळी ४.४८ वाजता सुटणार आहे. सलग दोन दिवस मेगा ब्लॉक २५ फेब्रुवारी आणि ४ मार्च रोजी वांगणी आणि नेरळ स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर अभियांत्रिकी मशिन्सच्या कामासाठी मध्यरात्री १.५० ते पहाटे ४.५० पर्यंत (३ तास) विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून १२.२४ वाजता सुटणारी कर्जत लोकल बदलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.