रविवारी निळजे कळंबोली दरम्यान विशेष ब्लॉक, अनेक गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:35 AM2018-12-08T05:35:04+5:302018-12-08T10:34:35+5:30
रविवारी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेचा नियमित मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलेला असताना निळजे-कळंबोली मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : रविवारी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेचा नियमित मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलेला असताना निळजे-कळंबोली मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी व मंगळवारी या मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याने अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांची वेळ बदलली आहे तर काही गाड्या रद्द केल्या आहेत.
मध्य रेल्वेतर्फे रविवारी निळजे ते कळंबोली दरम्यान सकाळी ९.५० ते दुपारी ४.५० वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. याशिवाय, मंगळवारी सकाळी ९.५० ते दुपारी १२.५० वाजेपर्यंत ३ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. नवी मुंबई मेट्रो मार्गाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल.
यामुळे भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, वसई रोड-पनवेल-वसई रोड-मेमू सेवा, सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस या गाड्या रविवारी रद्द केल्या आहेत. एलटीटी-तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस ही गाडी पनवेल येथून सुटेल. जामनगर-तिरुनेलवेल्ली एक्स्प्रेस चार तास उशिराने सुटेल. ग्वाल्हेर-पुणे एक्स्प्रेस कल्याणमार्गे वळवण्यात येईल. दादर-रत्नागिरी पॅसेंजर पनवेल येथून चालवण्यात येईल. एलटीेटी-मंगळुरू मत्स्यगंधा एक्स्प्रेस दिवा येथून ४.५० वाजता सोडण्यात येईल. रत्नागिरी-दादर पॅसेंजरची फेरी पनवेलला संपेल. एर्नाकुलम-निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस ४ तास उशिराने सुटेल. कोचुवेल्ली-चंदिगड संपर्क क्रांती एक्स्प्रेस ६ तास उशिराने धावेल. कोईम्बतूर-हिसार एक्स्प्रेस अडीच तास उशिराने सुटेल. हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस कल्याणमार्गे वळवण्यात येईल. तिरुअनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस एलटीटीला पावणेदोन तास उशिराने येईल. ११ डिसेंबरला दिवा-पनवेल-दिवा व दिवा-पेण-दिवा ही मेमू सेवा रद्द करण्यात येईल. याशिवाय काही गाड्यांची वेळ बदलण्यात येणार आहे.
>मध्य रेल्वे : मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक आहे. या कालावधीत अप धिम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरू राहील. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड व दिवा स्थानकात थांबतील व २० मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्ग : कुर्ला ते वाशी दरम्यान अप व डाऊन दोन्ही मार्गांवरील वाहतूक सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला व वाशी ते पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे : सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या मार्गावरील जलद अप व डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल व या कालावधीत या गाड्या अप व डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.