भक्तीचा महापूर! रविवार ठरला बाप्पाचा वार, गणेशोत्सव मंडळांत झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 11:58 AM2023-09-25T11:58:43+5:302023-09-25T11:59:12+5:30
खेतवाडीसह लालबाग आणि लगतच्या परिसरात सार्वजनिक मंडळांच्या गणशे मूर्तींच्या दर्शनाला दाखल झालेल्या भक्तांचा उत्साह पावसातही वाखणण्याजोगा होता.
मुंबई :
गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी, रविवारी घराबाहेर पडलेल्या नागरिकांमुळे मुंबापुरी श्रीगणेशाच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली. विशेषत: खेतवाडीसह लालबाग आणि लगतच्या परिसरात सार्वजनिक मंडळांच्या गणशे मूर्तींच्या दर्शनाला दाखल झालेल्या भक्तांचा उत्साह पावसातही वाखणण्याजोगा होता. पावसाची रिपरिप सुरू असतानाच चिकचिक होऊनही गर्दी तसूभरही कमी होत नसल्याचे चित्र होते.
मुंबापुरीत दाखल झालेल्या गणेश भक्तांना गणेश दर्शन घेता यावे म्हणून लोकलचा रविवारचा ब्लॉक रद्द करण्यात आला होता. बेस्टनेही गणेश भक्तांसाठी ठिकठिकाणी बसची व्यवस्था केली होती. मुंबई दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांच्या बस हाऊसफुल्ल होऊन येत होत्या. विशेषत: सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठीही अबालवृद्धांची गर्दी झाली होती. मंदिराचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.
रविवारी दिवसभर पाऊस सुरू असतानाही फोर्टचा राजा, खेतवाडीच्या गल्ल्या, गिरगावचा राजा, ताडदेवचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, मुंबईचा राज्यासह अंधेरीचा राजा आणि पूर्व व पश्चिम उपनगरातील श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी झुंबड उडाली होती. दरम्यान, भाविकांच्या गर्दीला आवरताना मंडळाचे कार्यकर्ते, पोलिसांची मात्र तारांबळ उडाली होती. पुढील दोन ते तीन दिवसच अशीच गर्दी राहणार आहे.
गणेशभक्तांची मोनो रेलला पसंती
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोनोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रविवारी गणपती पाहण्यास निघालेल्या अनेकांनी मोनो रेलला पसंती दिली. चेंबूर ते महालक्ष्मीपर्यंत मोनो सुरू आहे.
या मार्गिकेवरील बहुतांश स्थानके ही मुंबईच्या प्रसिद्ध अशा गणेश मंडळांच्या भोवती आहेत. त्यामुळेच आता यंदाच्या गणेशोत्सवाचा सर्वत्र उत्साह असताना मोनो रेलचे प्रवासी वाढले आहेत.
एकीकडे गणेशोत्सवात रस्ते वाहतूककोंडी किंवा अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात. तसेच लोकललाही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे वाहतूककोंडी आणि लोकलची गर्दी टाळण्यासाठी अनेक गणेश भक्त रविवारी मोनो रेलने प्रवासात करीत होते.
मध्य मुंबई आणि गणेशोत्सव साेहळा
दादर पूर्व स्थानक हे तांत्रिकदृष्ट्या वडाळ्यात आहे. अनेक जुने सार्वजनिक गणपती याच भागात आहेत. तिथून ही मार्गिका पुढे नायगाव, लोअर परळ, चिंचपोकळी मार्गे जेकब सर्कलला पोहोचते.
अनेक गणपती जवळ
नायगाव-लोअर परळ व चिंचपोकळी या संपूर्ण भाग लालबागच्या राजापासून ते गणेशगल्ली, तेजुकाया, चिंचपोकळीचा चिंतामणी या सर्व प्रसिद्ध व लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सवापासून पायी अंतरावर आहेत. परळ येथील मिंट कॉलनी स्थानकाशेजारी इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे.