मुंबई : सायकलप्रेमी मुंबईकरांसाठी रविवारचा दिवस खास ठरणार आहे. वाहनांची गर्दी आणि वेगापुढे मागे पडणा-या सायकलींसाठी एक रविवार महापालिकेने राखून ठेवला आहे. एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह) ते वरळी सी फेस ही ११.५ किलोमीटरची स्वतंत्र मार्गिका यासाठी तयार करण्यात आली आहे. निमंत्रितांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह) ते गिरगाव चौपाटी या ५ कि.मी. रस्त्यावर सायकलसाठी स्वतंत्र मार्गिकेचा रविवारी आरंभ होणारआहे.मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतूककोंडी, पार्किंगबरोबरच प्रदूषणही वाढविले आहे. त्यामुळे सायकलप्रेमींना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम पालिकेने हाती घेतला आहे. या अंतर्गत दक्षिण मुंबईत मोफत सायकल पार्किंग सुरू करण्यात आली होती. मुंबईत आजही सायकलप्रेमींची संख्या अधिक आहे. मुंबईतील काही सायकलस्वारांनी जागतिक स्पर्धांमध्येही भाग घेऊन देशाचे नाव उंचावले आहे. मात्र, मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांच्या वेगापुढे सायकल मागे पडत चालली होती. या सायकलप्रेमींना एक रविवार विरंगुळ्याचा देण्यासाठी पालिकेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकार घेतलेल्या या उपक्रमाला रविवारी सुरुवात होत आहे. त्यानंतर, १० डिसेंबरपासून नागरिकांसाठी ११.५ कि.मी. ही मार्गिका विनाशुल्क खुली होणार आहे.- सायकलप्रेमींसाठी एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह) ते वरळी सी फेस ही ११.५ किलोमीटरची स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली आहे.- नागरिक या ठिकाणी स्वत:ची सायकल आणून चालवू शकतात. शंभर रुपये तासाप्रमाणे या ठिकाणी सायकल चालविण्यासाठी उपलब्ध होणार आहे.- हौशी नागरिकांनी दर रविवारी सहभागी होऊन सायकलसाठी तयार करण्यात आलेल्या या स्वतंत्र मार्गिकेचा आनंद लुटावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सायकलप्रेमींसाठी रविवार ठरणार खास, दक्षिण मुंबईत स्वतंत्र मार्गिका, आज होणार शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 2:51 AM