मुंबई - डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणा-या महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर मात करीत सुनीतने आपले सलग पाचवे राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीमपराक्रम केला. फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुणेकरांनी बाजी मारली. पुरूषांमध्ये रोहन पाटणकर तर महिलांमध्ये स्टेला गौडे अजिंक्य ठरली. संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवले. मुंबईने सांघिक विजेतेपदावर तर उपनगरने उपविजेतेपदावर आपला कब्जा केला.
शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीतील फुललेले पीळदार सौंदर्य पाहिल्यानंतर रविवारची अंतिम फेरी ब्लॉकबस्टर होणार असा अंदाज होताच आणि मुंबईच्या वांद्य्रात क्रीडाप्रेमींना संडे ब्लॉकबस्टर अनुभवायला मिळालाच. वांद्रे पूर्वेला असलेले पीडब्ल्यूडी मैदान सायंकाळी पाच वाजताच खचाखच भरले होते आणि स्पर्धा सुरू होईपर्यंत मैदानाबाहेरही गर्दीचा महापूर दिसू लागला. आयोजक आणि क्रीडाप्रेमी कृष्णा (महेश) पारकर यांनी अभिनव फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने साकारलेला शरीरसौष्ठवाचा राज्य सोहळा बॉलीवूडच्या इव्हेंटला साजेसा असाच झाला. एकापेक्षा एक स्पर्धक, विक्रमी बक्षीसे, विक्रमी गर्दी, विक्रमी प्रतिसाद असे अनेक विक्रम नोंदविणाऱया महाराष्ट्र श्रीचे दिमाखदार आयोजन करून आयोजक पारकर यांनी अभूतपूर्व आयोजनाचाही नवा इतिहास घडवला.
सुनीत... सुनीत... चाच आवाज
चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्ससाठी दहा गटातील विजेते मंचावर आले तेव्हाच प्रेक्षकांमधून फक्त सुनीत... सुनीत...चाच आवाज येत होता. अंतिम लढतीत सुनीत हा महेंद्र चव्हाण आणि अतुल आंब्रेवर मात करून सलग पाचव्यांदा बाजी मारणार हा विश्र्वास जमलेल्या पाच हजार मुंबईकरांना आधीपासूनच होता आणि या अजिंक्यपद गटाच्या सात सर्वसामान्य पोझेस झाल्यानंतर सुनीतचे जेतेपदही निश्चित झाले. आयोजक कृष्णा पारकर यांनी महाराष्ट्र श्रीचे नाव जाहीर करण्यापूर्वीच प्रेक्षकांनीच सुनीत... सुनीतचा जयघोष करून त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विजेत्या सुनीतला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह रॉयल एनफिल्ड देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आयोजक कृष्णा पारकर, स्पर्धेचे प्रायोजक साई कन्सल्टन्सीचे सीएमडी अमित वाधवानी, अमरजीत मिश्रा, व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे, तसेच ऍड. विक्रम रोठे, मदन कडू, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
दोघा पुणेकर महेंद्रांमध्ये जोरदार संघर्ष
रविवारची अंतिम फेरी इतकी उत्कंठावर्धक होती की खेळाडूंनी तब्बल सहा तास क्रीडाप्रेमींना खिळवून ठेवले. अंतिम फेरीसाठी पात्र झालेल्या खेळाडूंपैकी प्रत्येक गटात किमान तीन-चार विजेते दिसत होते. पूर्ण स्पर्धेवर मुंबई आणि उपनगरच्याच खेळाडूंचे वर्चस्व दिसले. अनेक गटात काँटे की टक्कर झाली. पण आठवणीत राहिला तो दोन पुणेकर महेंद्र यांच्यात झालेला संघर्ष. 90 ते 100 किलो वजनी गटात फक्त चार खेळाडू होते. त्यापैकी महेंद्र चव्हाण आणि महेंद्र पगडे यांच्यात तब्बल तीनदा कंपेरिजन करण्यात आली. दोन्ही पुणेकर महेंद्र एकास एक असल्यामुळे गटविजेता नेमका कोण, हे ठरवणे जजेससाठी फार आव्हानात्मक होते. जजेसनी दोनदा कंपेरिजन केल्यानंतर व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर आणि छत्रपती पुरस्कार विजेते आनंद गोसावी यांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनीही दोघांची कंपेरिजन घेतली आणि आपला निर्णय कळविला. तीन-तीनदा कंपेरिजन केल्यानंतर महेंद्र चव्हाणला गटविजेता घोषित करण्यात आले आणि स्पर्धेतला एक संभाव्य विजेता महेंद्र पगडे गटातच बाद झाला.
मुंबई श्रीची ठाणे श्री विजेत्यावर मात
85 किलो वजनी गटातही गटविजेतेपदासाठी अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या गटातील पाचही खेळाडू भारी होते. गेल्या आठवड्यात मुंबई श्री झालेल्या सुजन पिळणकरची गाठ ठाणे श्री अजय नायरशी पडली. या दोघांतही पंचांनी कंपेरिजन केली आणि आपला कौल सुजनच्या बाजूने दिला. मुंबई श्रीत उपविजेत्या ठरलेल्या सकिंदर सिंगला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तर रोहित शेट्टी तिसरा आला.
मुंबईची दहशत, उपनगरचे वर्चस्व
यंदाही महाराष्ट्र श्रीवर मुंबईचेच वर्चस्व राहणार हे आधीच स्पष्ट होते. मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी आपली ताकद अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिली. अंतिम फेरीत पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या 47 खेळाडूंपैकी 28 खेळाडू मुंबई-उपनगरचे होते. त्यापैकी सहा गटात मुंबईकरांनी गटविजेतेपदाचा मान मिळविला. दोघांनी प्रत्येकी तीन-तीन गटविजेतेपद पटकावली तर सुनीतने महाराष्ट्र श्री जिंकून मुंबईला सांघिक विजेतेपदाचाही मान मिळवून दिला. मुंबईने 80 किलो वजनीगटात निर्भेळ यश संपादले. या गटातील तिन्ही पदके मुंबईच्याच सागर कातुर्डे, सुयश पाटील आणि सुशांत रांजणकरने पटकावली. मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेच्या 65 किलो गटात पुण्याचा श्रीनिवास वास्के तर 90-100 वजनीगटात महेंद्र चव्हाण अव्वल आला. पुण्याने या दोन गटविजेतेपदाबरोबर फिजीक स्पोर्टस्ची दोन्ही सुवर्ण पदकेही जिंकली. तसेच पश्चिम ठाणे आणि पालघर या जिल्हयांनीही प्रत्येकी एक सुवर्ण जिंकले.
फिजीक स्पोर्टस्मध्ये पुणेकर सरस
मुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंनी मुख्य स्पर्धा गाजविली असली तरी फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुणेकर सरस दिसले. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुण्याच्या रोहन पाटणकरने सुवर्णमयी कामगिरी केली. त्याच्याच जिल्हयाचा किरण साठे दुसरा आला. तिसरे स्थान मुंबईकर रोहन कदमने संपादले. महिलांच्या मॉडेल स्पोर्टस् प्रकारात पुण्याचीच स्टेला गौडे अव्वल आली. तिने मुंबईच्या डॉ. रिता तारीला मागे टाकून सुवर्ण जिंकले. पुण्याची आदिती बंग तिसरी आली.
महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल
55 किलो वजनी गट - 1. संदेश सकपाळ (मुं. उपनगर), 2. नितीन शिगवण (मुं. उपनगर), 3. ओमकार आंबोकर (मुंबई), 4. राजेश तारवे (मुंबई), 5. कुतुबुद्दीन (कोल्हापूर).
60 किलो वजनी गट - 1. नितीन म्हात्रे (प. ठाणे), 2. विनायक गोळेकर (मुंबई), 3. तेजस भालेकर (मुंबई), 4. संदीप पाटील (ठाणे), 5. बप्पन दास (मुं. उपनगर).
65 किलो वजनी गट - 1. श्रीनिवास वास्के (पुणे), 2. आदित्य झगडे ( मुं. उपनगर), 3. प्रतिक पांचाळ ( मुं. उपनगर), 4. फय्याज शेख (सातारा), 5. उमेश पांचाळ (मुंबई).
70 किलो वजनी गट - 1. रितेश नाईक (पालघर), 2. सचिन खांबे (पुणे), 3. विघ्नेश पंडित (मुंबई), 4. अमित सिंग (मुंबई), 5. रविंद्र वंजारी ( जळगाव).
75 किलो वजनी गट - 1. सुशील मुरकर (मुं. उपनगर), 2. समीर भिलारे (मुंबई), 3. अमोल गायकवाड (मुंबई), 4. ऋषिकेश पासलकर (पुणे), 5. स्वप्निल नेवाळकर ( पालघर).
80 किलो वजनी गट - 1. सागर कातुर्डे (मुंबई), 2. सुयश पाटील ( मुंबई), 3. सुशांत रांजणकर (मुंबई), 4. संदेश नलावडे (पुणे), 5. प्रशांत परब (मुंबई).
85 किलो वजनी गट - 1. सुजन पिळणकर (मुंबई), 2. अजय नायर ( ठाणे), 3. रोहित शेट्टी (मुं. उपनगर), 4. सकिंदर सिंग (मुं. उपनगर), 5. रोहन धुरी (मुंबई).
90 किलो वजनी गट - 1. सुनीत जाधव ( मुंबई), 2. राहुल कदम ( पुणे), 3. सचिन डोंगरे ( मुं. उपनगर), 4. योगेश सिलिबेरू ( ठाणे), 5. इंदेश पाटील ( पुणे).
90-100 किलो गट - 1. महेंद्र चव्हाण (पुणे), 2. महेंद्र पगडे (पुणे), 3. श्रीदीप गावडे ( मुंबई). 4. नितीन रूपाले ( मुं. उपनगर).
100 किलोवरील गट - 1. अतुल आंब्रे (मुंबई), 2. अक्षय मोगरकर ( ठाणे), 3. अक्षय वांजळे (पुणे).
फिजीक फिटनेस (पुरूष) - 1. रोहन पाटणकर ( पुणे), 2. किरण साठे (पुणे), 3. रोहन कदम (मुंबई), 4. हनिफ भक्षे ( ठाणे), 5. गौरव यादव (सातारा).
स्पोर्टस् मॉडेल (महिला) - 1. स्टेला गौडे ( पुणे), 2. डॉ. रिता तारी (मुंबई), 3. आदिती बंग ( पुणे), 4. तन्वीर फातिमा हक (पुणे), 5. निशरीन पारिख (मुंबई).
सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू - अतुल आंब्रे ( मुंबई)
बेस्ट पोझर - श्रीनिवास वास्के ( पुणे)
सांघिक उपविजेतेपद - मुंबई उपनगर
सांघिक विजेतेपद - मुंबई
उपविजेता - महेंद्र चव्हाण ( पुणे)
महाराष्ट्र श्री - सुनीत जाधव (मुंबई)