Join us  

राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 12:57 PM

राज्यात महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात असल्याने आमची ही जागा सहज निवडून येईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

Chhagan Bhujbal ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अखेर अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत आमच्याकडून सुनेत्रा पवार या उमेदवार असतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या जागेसाठी मी इच्छुक होतो, मात्र पक्षात सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याने छगन भुजबळ नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र ही चर्चा भुजबळांनी फेटाळून लावली आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसत आहे का? सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत, असं ते म्हणाले.

राज्यसभा पोटनिवडणुकीबाबत पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, "या जागेसाठी माझ्यासह आनंद परांजपे हेदेखील इच्छुक होते. मात्र आमच्या पक्षातील कोअर कमिटीच्या आम्ही सर्व सदस्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याविषयी निर्णय घेतला. यामध्ये अजितदादांचा काहीही संबंध नाही. एक जागा असल्यामुळे इच्छुक असलेल्या सर्वांनाच उमेदवारी देणं शक्य नव्हतं," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, "राज्यात महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात असल्याने आमची ही जागा सहज निवडून येईल. त्यामुळे महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही, असं मला वाटतं," असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

भुजबळांचा दुसऱ्यांदा अपेक्षाभंग

लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमदेवारीसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं नकार दिला अन् अखेर वैतागून भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राज्यसभेसाठीही पक्षाकडून नावाचा विचार केला न गेल्याने छगन भुजबळ यांच्या अपेक्षांवर दुसऱ्यांदा पाणी फेरलं गेलं आहे. 

टॅग्स :छगन भुजबळराज्यसभासुनेत्रा पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार