लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-महाराष्ट्र फाऊंडेशनचे सुनील देशमुख (६४) यांचे अमेरिकेत मायामी येथे प्रदीर्घ आजाराने दि,४ जानेवारीला निधन झाले.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रतिभा, दोन मुलगे आणि एक मुलगी अमेरिकेत राहतात.
गेली अनेक वर्षे महाराष्ट्र फाऊंडेशनमार्फत साहित्य व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व संस्था यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. त्यांनी अमेरिकेत वॉल स्ट्रीटवर पहिला मराठी कमोडिटी ट्रेडर म्हणुन यशस्वी कारकीर्द गाजवली. वयाच्या ४५ व्या वर्षी व्यवसातून निवृत्ती घेऊन सामाजिक कामासाठी उर्वरित आयुष्य व्यतीत केले. अमेरिकेत राहून त्यांची मराठी मातीशी घट्ट नाळ कायमच राहिली. मराठी साहित्य, वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संस्था, महिलांचे प्रश्न, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात ते कायम सक्रिय राहिले. दर वर्षी ते स्वतः मुंबई पुणे येथे महाराष्ट्र फाउंडेशनचा बक्षीस समारंभ आयोजित करत. त्यांनी अनेक सामाजिक विषयावर लिखाण केले आहे. नुकतेच त्यांनी 'प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आणि वर्तमान' या विषयावर पुस्तक लिहिले.
सुनील देशमुख यांच्या निधनाने सतत सामजिक भान जपणारे , वैचारिक आणि बहुयामी व्यक्तिमत्त्व काळाआड गेले आहे.तसेच मराठी साहित्य व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया जेष्ठ उद्योजक मोहन देशमुख यांनी दिली.
त्यांची शोकसभा सोमवार दि,९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता युवक बिरादरी ऑफिस, हझारिमल सोमाणी मार्ग, ( बॉम्बे जिमखाना मागे) बोरीबंदर, येथे आयजित करण्यात आली आहे अशी माहिती देशमुख यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"