मुंबई - वास्तवाची जाण ठेवत आपल्या कुंचल्याला आध्यात्मिकतेची जोड देत चित्रकार सुनील जाधव यांनी अंतरयात्रा हे आध्यात्मिक चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. कुलाबा येथील जहांगीर कला दालनात हे प्रदर्शन सर्व कलारसिकांसाठी ५ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले आहे.
चित्रकार सुनिल जाधव यांच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे काही कलाकृती ओशोंच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. या चित्रांमधील व्यक्त होणारा शांतता हा भाव कला रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आहे. या प्रदर्शनाविषयी जाधव सांगतात, परमेश्वर आणि त्याची व्याप्ती कुणी ठरवावी याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे चित्रातून व्यक्त होणारी अमर्यादता प्रगल्भ आहे. त्याची प्रचिती दाखविण्यासाठी या कलाकृतींमध्ये गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, कृष्ण,गणपती यांचे चित्रण करण्यात आले आहे.
प्रदर्शनातील कलाकृती या मनाचा शोध, भगवान बुद्धांचा प्रवास या संकल्पनांनी भारलेल्या आहेत, यात आध्यात्मिक मोक्षाचीही चित्रे रेखाटण्यात आली आहेत. भारतीय तत्वज्ञानातले चिरंतन विचार कलेच्या माध्यमातून सोपे करून लोकांपर्यंत पोहोचवता येतात, असे जाधव यांनी सांगितले. माध्यम कुठलेही असले तरी आत खोल सुरू असलेल्या आध्यात्मिक आकलनाचे प्रगटीकरण शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. चित्रकार जाधव यांचे शिक्षण एमएफएपर्यंत झाले असून त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.