मुंबई- पावसाळा तोंडावर आला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सामान्य मुंबईकर आधीच बेजार झाला आहे. पाऊस पडल्यावर याचा अधिक फटका मुंबईकर सामान्य जनतेला होणार आहे.राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेतील प्रशासक यांच्या ढिसाळ कारभारामुळे सामान्य मुंबईकर पावसाळ्यापूर्वीच खड्ड्याने बेजार झाला आहे अशी टिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या सूचनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील शहर आणि दोन्ही उपनगरातील ४०० किमीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांसाठी नव्याने ६,०७९ कोटींचे कंत्राट केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मर्जीतील राष्ट्रीय महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या पाच मोठ्या बांधकाम कंपन्यांना दिले. दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यांसाठी परदेशात वापरल्या जाणाऱ्या पोरस सिमेंट वापराची अट नव्या टेंडरमध्ये घालण्यात आली आहे.मात्र काम सुरू करण्याआधी या पाच कंत्राटदारांना अग्रिम रक्कम देऊन देखिल आज मिती पर्यंत पूर्ण क्षमतेने काम सुरू न झाल्याने याच रस्त्यांवरील पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी अजून एका कांत्रादराची नेमणूक करण्यात आली अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी लोकमतला दिली.
खरेतर ही जबाबदारी रस्ता बनविण्याचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारांची असते, परंतू राज्य आणि केंद्र सरकारच्या मर्जीतील या कंत्राटदारांनी महापालिका प्रशासनाला सपशेल नकार दिल्याने नामुष्की टाळण्यासाठी खड्डे बुजविण्यासाठी अजून वेगळ्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. तरीही या कंत्राटदाराने देखिल वेळकाढू पणाचे धोरण अवलंबल्याने रस्त्यावरील खड्डे अजूनही तसेच आहेत असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील रस्त्यांची खड्डेमय परिस्थिती असताना देखील महापालिका प्रशासनाला जाग आलेली नसून राज्य सरकारच्या आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे रत्यावरील खड्ड्यांचा मुंबईकर सामान्य जनतेला जो त्रास होईल,त्याचा बदला मुंबईकर जनता नक्कीच लोकशाही पद्धतीने घेईल असा इशारा त्यांनी दिला.