माहुल गांव येथे प्रदूषणकारी रिफायनरींवर कठोर कारवाईची आमदार सुनील प्रभू यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 08:56 PM2018-07-04T20:56:01+5:302018-07-04T20:56:22+5:30
माहुल गांव येथे वायू प्रदूषण करणाऱ्या रिफायनरी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी आग्रही मागणी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई - मुंबई पूर्व उपनगरातील माहुल गांव येथे असलेल्या रिफायनी कंपन्यांमूळे होणारे वायू प्रदुषण, तसेच दूषीत पाण्यामुळे परिसरातील रहिवाश्यांच्या आरोग्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वायु प्रदुषणामुळे या परिसरात अनेक मृत्युच्या घटना होत असल्याने परिसरातील नागरिकांनी वायु प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी अशी वेळोवेळी मागणी शासनाकडे करुनंही कोणतीच निर्णयात्मक उपाययोजना शासनाने केली नाही.
त्यामुळे माहुल गांव येथे वायू प्रदूषण करणाऱ्या रिफायनरी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी आग्रही मागणी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी पत्रा द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
माहुल गावात राहणाऱ्या नागरीकांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी आणि मानवाधिकारासाठी रहिवाश्यांना तेथून हलवून मुंबईमधील इतरत्र नागरी सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करावे. तसेच एम.पी.सी.बी.चा अभ्यास एन.जी.टी. ची केस पूर्ण होई पर्यंत तेथे अजून कोणतीही पी.ए.पी. स्थलांतरीत करण्यास त्वरीत स्थगिती द्यावी. तसेच माहूल येथील उद्योगधंदे व रिफायनरीमुळे वाढते वायु प्रदुषण रोखण्यासाठी आपण या प्रदूषणाबाबतची सखोल माहिती मागवून घ्यावी व कायमस्वरुपी कोणते उपाय व त्यानुषंगाने पर्यायी अंमलबजावणी करता येर्ईल याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा असे आमदार प्रभू यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील नागरीकांच्या निरोगी आरोग्य विषयक उपाययोजनाकरीता आपले सरकार सदैव हितकारक निर्णय व त्यानुषंगाने अंमलबजावणी करीत असल्याने निश्चितच माहूल गावातील नागरिकांना मुंबईतच अन्यत्र त्यांचे पुनर्वसन करावे, म्हणजे त्यांना स्थिरता मिळू शकेल. अशी मागणी देखील आमदार प्रभू यांनी शेवटी केली आहे.