Join us

मुंबई पोलिस आयुक्तांनी काढलेले परिपत्रक तात्पुरत्या कालावधीकरिता रद्द करावे, सुनील प्रभू यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: February 13, 2023 9:07 PM

मुंबई वॉटर टँकर असो. (नोंदणीकृत) समन्वयाने सर्व समावेशक असे नविन परिपत्रक काढावे.

मुंबई-पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या कार्यालयाद्वारे जाहिर केलेले परिपत्रक क्र. पोआ/ सपोआ. आ. मै. वि. / भूजल / ३८ /२०२३, दि.३/२/२०२३ जाचक असून याच्या विरोधात गुरुवार दि. ८ फेब्रुवारी पासून संपूर्ण टँकर असो. संप केला असून याचा त्रास उपरोक्त सर्व सेवा सुविधांवर झाला आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालये, रुग्णालये आणि इतर मूलभूत सुविधा पुरविणा-या संस्था व आस्थापने कोलमडण्याच्या अवस्थेत असून सामान्य मुंबई करांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच कामा निमित्त मुंबई शहराला भेट देणा-या प्रवश्यांना देखील याचा फटका पडत असून उपहारगृहे आणि निवासी हॉटेलना देखील अडचणींचा सामना करावा लागत असून मुलभूत सुविधे अभावी जनजीवन विस्कळीत होत आहे. 

सामान्य मुंबईकर जनतेला तात्काळ दिलासा देण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या कार्यालयाद्वारे दि. ३ फेब्रुवारी, २०२३ रोजी काढण्यात आलेले परिपत्रक तात्पुरत्या कालावधीकरिता रद्द करून व मुंबई वॉटर टैंकर असो. (नोंदणीकृत) समन्वयाने, सर्व समावेशक असे नविन परिपत्रक काढण्यात यावे अशी आग्रही मागणी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे ट्विट व एका पत्राद्वारे केली आहे.

यास्तव संदर्भीय परिपत्रक तात्पुरत्या कालावधीकरिता रद्द करून व मुंबई वॉटर टँकर असो. (नोंदणीकृत) समन्वयाने सर्व समावेशक असे नविन परिपत्रक काढणे आवश्यक आहे. जेणेकरुन उपरोक्त संस्था व आस्थापनांना सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकेल असे मत आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केले.

मुंबई शहर हे भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते या शहराला बृहन्मुंबई महानगपालिका सक्षमपणे पाणी पुरवठा करते त्या सोबतच खाजगी टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. टँकरद्वारे निवासी गृहनिर्माण संस्था, व्यावसायीक इमारती, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नेव्हलडॉक, कोस्टलरोड प्रकल्प, शिवडी न्हावाशेवा प्रकल्प, रेल्वे यार्डस्, रुग्णालये, मेट्रो, एमएमआरडीए द्वारे सुरु असलेले प्रोजेक्ट, मुंबई महानगरपालिकेद्वारे सुरु असलेले पायाभूत सुविधा विकास प्रकल्प तसेच इमारत पुर्नविकास व पुर्नबांधणी प्रकल्प, बीकेसी, शिपींग कॉर्पोरेशन इंडिया, सिमेंटप्लॅन्ट, खासगी व महापालिका उद्याने, खेळाची मैदाने, रिफायनरी, सुलभ शौचालये, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ, बँक, औद्योगिक वसाहती, बीएसटी डेपो, झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प, हॉटेल, उपहारगृहे, शाळा इत्यादी अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येतो असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

टॅग्स :सुनील प्रभूशिवसेनाभाजपामुंबई