सुनील प्रभू यांचा ‘तो’व्हीप बनावट; शिंदे गटाच्या वकिलांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 05:50 AM2023-11-23T05:50:35+5:302023-11-23T05:51:04+5:30
दोन व्हीपवर करण्यात आलेल्या सह्या आणि संदर्भ क्रमांक यावर बोट ठेवत त्यांनी हा दावा केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ठाकरे गटाकडून ज्या व्हीपच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र असल्याचा प्रमुख दावा आहे. तो व्हीपच बनावट असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या दोन व्हीपवर करण्यात आलेल्या सह्या आणि संदर्भ क्रमांक यावर बोट ठेवत त्यांनी हा दावा केला आहे. प्रभू यांनी हा दावा फेटाळला.
आमदार अपात्रतेवरील सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी प्रश्नांची सरबत्ती प्रभू यांच्यावर केली. प्रभू यांनीही शिताफीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रावरील संदर्भ क्रमांकाच्या प्रश्नावर संभ्रम निर्माण झाल्याने तो पक्षाच्या कार्यालयीन कामकाजाचा भाग असल्याने आताच मला सांगता येणार नाही, असे उत्तर प्रभू यांनी दिले.
...तर ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय अशक्य
अशाच प्रकारे सुनावणी सुरू राहिली तर ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय देणे अशक्य होईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. सार्वजनिक सुट्ट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता सुनावणी पूर्ण करण्याकरिता फक्त १६ दिवसांचा कालावधी आहे. याच गतीने चालले तर सुनावणी पूर्ण करणे अवघड होईल, असे ते म्हणाले.