सुनील रामानंद यांची बदली रद्द
By admin | Published: January 11, 2017 06:51 AM2017-01-11T06:51:03+5:302017-01-11T06:51:03+5:30
पुण्याचे पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांची चार दिवसांपूर्वी राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी) करण्यात आलेली बदली अखेर सोमवारी रद्द करण्यात आली.
मुंबई : पुण्याचे पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांची चार दिवसांपूर्वी राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी) करण्यात आलेली बदली अखेर सोमवारी रद्द करण्यात आली. त्यांना पूर्ववत त्याच पदावर ठेवण्यात आले असून विशेष महानिरीक्षक रवींद्र कदम यांची सीआयडीमध्ये बदली करण्यात आली आहे. रामानंद यांच्या आकस्मिक बदलीमुळे पुण्यातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेत हा निर्णय घेतल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
रामानंद यांच्याबरोबर अन्य सात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने सोमवारी जारी केले. भाजपाचे पुण्यातील एका वजनदार नेत्याशी मतभेद झाल्याने सुनील रामानंद यांची मुदतपूर्व तेथून सीआयडीमध्ये उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांना पूर्वपदावर कायम ठेवत त्यांच्या जागी बदली करण्यात आलेल्या नागपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक कदम यांची सीआयडीला बदली करण्यात आली आहे. त्याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या एस.आर. शेलार यांची नक्षलविरोधी अभियानाचे विशेष महानिरीक्षक म्हणून निवड केली आहे. त्या पदावरील शिवाजी बोंडके यांची नागपूरच्या सहआयुक्तपदी बदली केली आहे. अन्य पोलीस उपायुक्त/ अधीक्षक पदावरील नियुक्त्या अशा (कंसात कोठून-कोठे ) : अखिलेश सिंह (यवतमाळ-मुंबई), एम.एम. दहिकर (मुंबई-दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), अनंत रोकडे (नागपूर ग्रामीण - सीआयडी पुणे), शैलेश बलकवडे (नागपूर रेल्वे-नागपूर ग्रामीण), साहेबराव पाटील (नियुक्तीच्या प्रतीक्षेत-लोहमार्ग नागपूर) (प्रतिनिधी)