विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू, सुनील शिंदे, सचिन अहिर, वरुण सरदेसाई आणि किशोरी पेडणेकर यांची नावे आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 04:02 PM2021-11-11T16:02:49+5:302021-11-11T16:03:36+5:30
Maharashtra Legislative Council Election: स्थानिक स्वराज्य संस्थेमधून येत्या दि,10 डिसेंबर रोजी माजी मंत्री रामदास कदम यांच्या रिक्त होणाऱ्या मुंबईच्या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार Sunil Shinde, शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री Sachin Ahir, युवासेना सचिव Varun Sardesai, विद्यमान महापौर Kishori Pednekar, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थेमधून येत्या दि,10 डिसेंबर रोजी माजी मंत्री रामदास कदम यांच्या रिक्त होणाऱ्या मुंबईच्या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे,शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री सचिन अहिर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई,विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी २०१४ ते २०१९ साली वरळीचे आमदार म्हणून नेतृत्व करणारे माजी आमदार सुनील शिंदे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपली जागा रिक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेतून विधानसभेच्या मुंबईच्या जागेवर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतून २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत आलेले शिवसेना उपनेते व माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा आहे.
मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ असलेले वरुण सरदेसाई हे युवासेनेचे सरचिटणीस आहेत. युवासेनेत ते लोकप्रिय असून शिवसेनेचा नवा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. मात्र २०२४ साली विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून ते विधानसभेची निवडणूक लढवतील अशी देखिल जोरदार चर्चा आहे. पार्लेकर असलेल्या वरुण सरदेसाई यांनी युवासेना व विलेपार्लेवर आपले लक्ष केंद्रीत केले असून येथे त्यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण केले आहे.
विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे.मुंबईत कोविड नियंत्रणात आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून मुंबई महानगर पालिकेत पक्षाची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली. मातोश्री त्यांच्या कामावर खुश असून त्यांच्या नावाचा देखिल आगामी विधानपरिषेच्या निवडणुकीत विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे. शिवसेनेत अनेक इच्छुक असले तरी शेवटी कोणाला तिकीट द्यायचे याचा अंतिम निर्णय शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतात अशी माहिती सूत्रांनी दिली.
आता जुन्यांना संधी नाही!
राज्याचे परिवहन मंत्री अँड.अनिल परब यांच्या विरोधातील तथाकथित ऑडिओ क्लिप मुळे मातोश्रीचा रोष ओढून घेणारे माजी मंत्री रामदास कदम यांना आता परत संधी मिळणार नाही.शिवसेनेत नव्या रक्ताला वाव देण्याची चर्चा असून यापूर्वी आमदारकी,मंत्रीपदे भूषवलेल्यांना परत आता संधी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.