Join us

सूर्यप्रकाश, खेळत्या हवेअभावी टीबी फोफावतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 2:29 AM

मुंबई महापालिकेच्या एम ईस्ट वॉर्डमधील लल्लूभाई कंपाउंड, पीएमजी कॉलनी आणि नटवर पारेख कंपाउंड या वसाहतींमधील ४० टक्के घरांमध्ये ‘डॉक्टर्स फॉर यू’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ३८१ क्षयरोगाचे (टीबी) रुग्ण आढळले आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या एम ईस्ट वॉर्डमधील लल्लूभाई कंपाउंड, पीएमजी कॉलनी आणि नटवर पारेख कंपाउंड या वसाहतींमधील ४० टक्के घरांमध्ये ‘डॉक्टर्स फॉर यू’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ३८१ क्षयरोगाचे (टीबी) रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या रुग्णांना टीबीची लागण होण्यामागे अपुरा सूर्यप्रकाश आणि खेळत्या हवेचा अभाव ही दोन प्रमुख कारणे असल्याचा निष्कर्ष संस्थेने काढला आहे. त्यामुळे गृहनिर्माण धोरणात आमूलाग्र बदल करण्याची मागणी संस्थेने मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.या वॉर्डमध्ये झालेल्या पुनर्विकासात चुकीच्या पद्धतीने झालेली घरांची बांधणी रहिवाशांच्या जिवावर बेतत असल्याचे धक्कादायक वास्तव संस्थेने मांडले आहे. संस्थेने केलेल्या दाव्यानुसार, एकाच घरात मोठ्या संख्येने वास्तव्य करणारे रहिवाशी, घरात येणारा अपुरा सूर्यप्रकाश आणि खेळत्या हवेचा अभाव या कारणांमुळे टीबी फोफावत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुनर्विकास नियमावलीत बदल करण्याची गरज आहे.मुळात या प्रकरणात तूर्तास तरी कुणालाही दोषी ठरविता येणार नसल्याचेही संस्थेने स्पष्ट केले. कारण या अहवालानंतर हे वास्तव उघडकीस आले आहे. मुळात केवळ ४० टक्के घरांचे सर्वेक्षण केल्यावर टीबी रुग्णांचा हा आकडा समोर आला आहे. त्यामुळे १०० घरांमध्ये या आकड्यात दुप्पटीने वाढ होण्याची शक्यताही संस्थेने व्यक्त केली. त्यामुळे टीबीला हद्दपार करण्यासाठी जनजागृती आणि उपचारासह गृहनिर्माण नियमावलीतही बदल करण्याची गरज आहे. म्हणूनच हा अहवाल लवकरच म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट या पुनर्विकास करणाऱ्या यंत्रणांना देणार असल्याचेही संस्थेने सांगितले. जेणेकरून यापुढे घरांची बांधणी करताना, या संदर्भात खबरदारी घेतली जाईल, असेही संघटनेचे म्हणणे आहे.>सर्वेक्षणात काय आढळले?टीबी फोफावू नये, म्हणून घरात किमान ३०० लक्स सूर्यप्रकाश पोहोचणे अपेक्षित आहे. याउलट तिन्ही वसाहतींमध्ये २०० लक्सहून कमी सूर्यप्रकाश पोहोचत असल्याचे निदर्शनास आले.घरात दरवाजा आणि खिडकी एकाच दिशेने असल्याने खेळती हवा नाही. परिणामी, श्वास घुटमत असून, टीबीचे जंतू अधिक वेगाने पसरतात.प्रमाणाहून अधिक लोक घरात राहत असल्याने, विशेषत: लहान मुलांचा समावेश असल्याने टीबीची लागण होत आहे.<काय बदल अपेक्षित?पुनर्विकास करताना आर्किटेक्टने घरात पुरेशा सूर्यप्रकाश येतोय का, याची पाहणी करावी. त्याप्रमाणेच, घराची बांधणी करावी.घरात खेळती हवा राहावी, याचे नियोजन घर बांधणी करताना करावे.प्रमाणाहून अधिक लोक घरात राहताना टीबी असलेल्या रुग्णापासून लहान मुलांना दूर ठेवावे. रुग्णाच्या थुंकीसाठी वेगळे भांडे ठेवावे.कुटुंबाने रुग्णावरील उपचार पूर्ण होईपर्यंत मानसिक, आर्थिक आधार द्यावा.