आझाद मैदानात ‘सुन्नी इज्तेमा’
By admin | Published: December 11, 2015 01:42 AM2015-12-11T01:42:44+5:302015-12-11T01:42:44+5:30
सुन्नी दावते इस्लामीने आयोजित केलेल्या सुन्नी इज्तेमाला शुक्रवारी, ११ डिसेंबरपासून आझाद मैदानात सुरुवात होत आहे.
मुंबई : सुन्नी दावते इस्लामीने आयोजित केलेल्या सुन्नी इज्तेमाला शुक्रवारी, ११ डिसेंबरपासून आझाद मैदानात सुरुवात होत आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या इज्तेमावेळी अनुयायांनी मोबाइल वगळता कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
यंदा २५ वे वर्ष असलेल्या इज्तेमासाठी पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सुमारे ४५० पोलिसांची फौज तैनात केल्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले. अनुयायांनी कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ आणि लॅपटॉप, हँडीकॅम अशा
इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नयेत, असे आवाहन केल्याचेही शिसवे यांनी सांगितले.
शुक्रवारच्या कार्यक्रमासाठी केवळ महिला उपस्थित असतील, तर शनिवार व रविवार खास पुरुषांसाठी राखीव असेल. रोज एक लाख आणि रविवारच्या सामुदायिक प्रार्थनेसाठी सुमारे दोन लाख नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.
इज्तेमामध्ये मौलाना सय्यद मोईनुद्दीन अश्रफ यांच्यासोबत देश-विदेशातील ११ मौलाना उपस्थित राहून अनुयायांना मार्गदर्शन
करतील.
इस्लाम आणि जागतिक शांतता, सुफी संतांची जागतिक शांतीमधील कामगिरी, जगातील गरिबी नष्ट करण्यासाठी इस्लामची शिकवण, शिक्षणाला उत्तेजन देणारी इस्लामची भूमिका, महिलांच्या जीवनातील प्राधान्यक्रम, मानवी विकासातील महिलांचे स्थान अशा विविध विषयांवर मुस्लीम मौलाना मार्गदर्शन करतील. (प्रतिनिधी)