Join us

सरकारी संकेतस्थळावर अवतरली सनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2016 5:56 AM

सरकारी संकेतस्थळे वेळच्या वेळी अद्ययावत न होणे, अतिभारामुळे कोलमडणे, असे प्रकार आपल्याला नवीन नाहीत. मात्र, आता राज्य शासनाने सायबर सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्याची हद्द गाठली आहे

प्रमोद गवळी, मुंबईसरकारी संकेतस्थळे वेळच्या वेळी अद्ययावत न होणे, अतिभारामुळे कोलमडणे, असे प्रकार आपल्याला नवीन नाहीत. मात्र, आता राज्य शासनाने सायबर सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्याची हद्द गाठली आहे. राज्य शासनाच्या अपंग साहाय्यताविषयक संकेतस्थळावर चक्क बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी हिच्या पोर्न संकेतस्थळाची लिंक अपलोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कित्येक दिवस उलटूनही याची गंधवार्ता सरकारला लागलेली नाही.महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्याsadm.maharashtra.gov.in  वर अपंगांचे अपंगत्वाचे प्रमाण मोजण्याची सुविधा आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच अपंगांना प्रमाणपत्रही देण्यात येते, तसेच प्रमाणपत्र देण्यात आलेल्यांची नावे आणि अर्ज फेटाळण्यात आलेल्यांची नावेही या संकेतस्थळाच्या डॅशबोर्डवर दर पंधरा मिनिटांनी अपलोड होत असतात. याच ठिकाणी शासनाच्या संबंधित अन्य सात संकेतस्थळांच्या लिंक देण्यात आल्या आहेत. त्यापैकी  nivh.gov.in  ही नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हिज्युअल चॅलेंज या संस्थेच्या संकेतस्थळाची लिंक बदलून कोणा सायबर भामट्यांनी nivh.in अशी अश्लील संकेतस्थळाची लिंक तिथे दिली आहे. दुसरीकडे nivh.gov.in हे सरकारी संस्थेचे संकेतस्थळ मात्र सुरळीत सुरू आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची प्रशासनाला गंधवार्ताही नाही. हा प्रकार औरंगाबाद येथील भाजपाचे कार्यकर्ते सतीश ललवानी यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हॉट्सअ‍ॅप करून ही बाब कळवली, तरीही त्यावर पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.हे संकेतस्थळ महाराष्ट्र शासन आणि टाटा कन्सल्टन्सी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘महाआॅनलाइन’ नावाच्या कंपनीकडून चालविण्यात येते. या संकेतस्थळाच्या तंत्रविभागाचे प्रमुख मोहीत कालरा यांच्याशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही.